तरुण पिढीच उज्ज्वल राष्ट्र घडवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:11 AM2021-04-19T04:11:10+5:302021-04-19T04:11:10+5:30
पुणे : आत्मनिर्भर भारतासाठी आपल्या देशातील तरुणाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. देशातील तरुण पिढीचा योग्य प्रकारे उपयोग करून ...
पुणे : आत्मनिर्भर भारतासाठी आपल्या देशातील तरुणाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. देशातील तरुण पिढीचा योग्य प्रकारे उपयोग करून घेतल्यास एक उज्ज्वल राष्ट्र घडवण्यास नक्कीच मदत होईल. तसेच केंद्र शासनातर्फे ‘नवीन युवा धोरण’ तयार केले जात असून ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणचा विस्तार असेल. त्यात तंदुरुस्ती आणि खेळ यावर अधिक जोर देण्यात येईल, असे केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.
सिम्बायोसिस सेंटर फॉर इमोशनल वेल-बिइंग, एसआययू व एमपॉवर यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत किरेन रिजिजू बोलत होते. यावेळी सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, सिम्बायोसिसच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर ,कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, एमपॉवरच्या संस्थापक नीरजा बिर्ला, सिम्बायोसिस विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरावडेकर, गिरिजा महाले आदी उपस्थित होते.
रिजीजू म्हणाले, भारताला एक उत्तम क्रीडा राष्ट्र बनवायचे असून त्यासाठीच ‘खेलो इंडिया’ हा उपक्रम राबविला जात आहे. त्यात विद्यापीठ स्तरावर खेळले जाणारे खेळ हे जागतिक दर्जाचे आहेत. तसेच केंद्र शासनाने ‘फिट इंडिया’ मोहीम सुरू केली असून त्यासाठी भारतातील विद्यापीठांनी नेतृत्त्वाची भूमिका घ्यावी.
भारत विकसनशील राष्ट्र असून येथे सर्वत्र स्पर्धात्मक वातावरण आहे. त्यामुळे देशातील विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त होते; तेव्हाच ती जीवनाच्या सर्व बाबींमध्ये यशस्वी होते. केवळ क्रीडा क्षेत्रातीलच व्यक्ती नव्हे तर प्रत्येक भारतीय व्यक्ती तंदुरुस्त असायला हवी, असेही रिजीजू यांनी सांगितले.