पावसाळ्याच्या तोंडावर आंबील ओढ्याच्या शेजारील सोसायट्या धास्तावल्या; नगरसेवकांची आश्वासने विरली हवेतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 08:42 PM2020-05-26T20:42:38+5:302020-05-26T20:43:40+5:30
गेल्यावर्षी शहरात आलेल्या पुरामध्ये सर्वाधिक नुकसान झालेल्या आंबील ओढ्याशेजारील सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
पुणे : शहरात गेल्यावर्षी आलेल्या पुरामध्ये सर्वाधिक नुकसान झालेल्या आंबील ओढ्याशेजारील सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पावसाळा तोंडावर आलेला असतानाच या सोसायट्यांच्या सुरक्षा भिंती अद्यापही बांधून न मिळाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नगरसेवकांना सोसायट्यांना दिलेल्या आश्वासनांचा वर्षभरातच विसर पडल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
शहरात गेल्या वर्षी २५ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणच्या नाल्यांना पूर आला होता. या पुरात सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेच्या नुकसानीसोबतच मोठया प्रमाणावर जीवितहानी झाली होती. सर्वाधिक नुकसान शहरातील सर्वात मोठ्या आंबील ओढ्याचे झाले होते. या घटनेनंतर स्थानिक कार्यकर्ते, महापालिका, नगरसेवक, विविध संस्थानी मोठ्या प्रमाणावर मदतकार्य सुरू केले होते. दरम्यानच्या काळात राजकीय पक्षांचे शहर आणि राज्य पातळीवरील नेते भेटी देऊन गेले होते. लोकांनी या नेत्यांसमोर आपला रोषही व्यक्त केला होता. शहरातील १४ किलोमीटरचा सर्वात मोठा नाला असलेल्या आंबील ओढ्याचे मोठे नुकसान झाले होते.
नाल्या शेजारील शेकडो सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. या सोसायट्या आणि नाल्याच्यामध्ये असलेल्या संरक्षक भिंती पडल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी आतापर्यत घुसले होते. यामुळे अनेक घरांची पडझड झाली होती. झाडे उन्मळून पडली होती. पुरानंतर महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते यांच्यासह विविध पदाधिकारी महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, स्थानिक क्षेत्रीय अधिकारी यांनी वारंवार भेटी देऊन लोकांचे सांत्वन करतानाच ढीगभर आश्वासनेही दिली होती. काही नगरसेवकांनी पदाधिकारी आणि अधिकारी यांना आपल्या प्रभागातील सोसायट्यांमध्ये फिरवून संरक्षक भिंती बांधून देण्याचेही आश्वासन दिले होते. मात्र, अवघ्या आठच महिन्यात या आश्वासनांचा नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना विसर पडला आहे. आपल्याला भिंत बांधून मिळेल अशा आशेवर सोसायट्या होत्या. परंतु, प्रशासनाने वारंवार याबाबत खुलासा करताना आम्ही भिंत बांधून देऊ शकत नाही अशी भूमिका स्पष्ट केली होती. परंतु, काही नगरसेवकांनी सोसायट्यांना पालिका भिंती बांधून देणार असल्याचे सांगितल्याने सोसायट्याही निर्धास्त राहिल्या. परंतु, पावसाळ्याच्या तोंडावर नगरसेवकही हात वर करू लागले आहेत. त्यामुळे सोसायट्या हवालदिल झाल्या आहेत. कारण, संरक्षक भिंती बांधण्याचा खर्च परवडणारा नाही असे सोसायट्यांचे म्हणणे आहे.
------------
महापालिकेला खासगी सोसायट्यांच्या संरक्षक भिंती बांधून देता येत नाहीत. याबाबत पालिकेच्या मुख्य सभेमध्येही चर्चा झालेली होती. प्रशासनाने त्याबद्दलची भूमिकाही स्पष्ट केली होती. परंतु, काही नगरसेवक सोसायट्यांना हे काम महापालिकेकडून आम्ही करून घेणार आहोत असे सांगत राहिले. त्यांच्यावर विश्वास ठेवत सोसायट्याही निर्धास्त राहिल्या. परंतु, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यात पुन्हा लोकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर वेळीच तोडगा न काढल्यास पुन्हा पुरासदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्यांची घरे तळमजल्यावर आहेत त्यांना तर अन्यत्र जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
--------------
पुरामुळे आमचे अतोनात नुकसान झाले. घरामध्ये १२ फुटांपर्यंत पाणी होते. भिंत बांधायला सोसायटीने कोट्यवधी रुपये कुठून आणायचे. अनेकांचे पूर्ण संसार वाहून गेले, तर कित्येकांच्या गाड्या वाहून गेल्या. यंदा पावसाळ्यात पाणी पुन्हा घरांमध्ये घुसण्याचा धोका आहे. स्थानिक नगरसेवक, आमदार, पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी भिंत बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. बजेटमध्ये तरतूद केल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, आता भिंत बांधून देता येणार नाही असे नगरसेवक सांगत आहेत. आम्ही फोन केला तर भेटणे सुद्धा टाळत आहेत. या स्थितीत आम्ही काय करावे असा प्रश्न आहे.
- अमोल जोशी, (सचिव), चंद्रकांत आल्हाटे, सदस्य गुरुराज सोसायटी