पाऊस सुरू झाल्याने भाताच्या रोपांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:08 AM2021-07-10T04:08:13+5:302021-07-10T04:08:13+5:30

भोर : भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी धूळवाफेवर पेरलेल्या भाताच्या रोपांची उगवण चांगली झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाताच्या लागवडीला ...

The onset of rains has saved the lives of paddy plants | पाऊस सुरू झाल्याने भाताच्या रोपांना जीवदान

पाऊस सुरू झाल्याने भाताच्या रोपांना जीवदान

Next

भोर : भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी धूळवाफेवर पेरलेल्या भाताच्या रोपांची उगवण चांगली झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाताच्या लागवडीला सुरवात केली होती. मात्र मागील १२ ते १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने भाताच्या लावण्या रखडल्या होत्या. भाताची रोपे पाऊस नसल्यामुळे पिवळी पडली होती. त्यामुळे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहात होते. आज दुपारपासून पाऊस सुरू झाल्याने रोपांना जीवदान मिळणार असून, रखडलेल्या भात लागवडी पुन्हा सुरू होणार आहेत. यामुळे शेतकरी आनंदात आहेत.

भोर तालुक्यात पश्चिम व पूर्व असे दोन भाग पडत असून, पश्चिम भागात निरादेवघर धरण भागातील हिर्डोशी खोरे तर, भाटघर धरण भागातील भुतोंडे व वेळवंड खोऱ्यात महुडे खोरे, आंबवडे खोरे भागात मे महिन्यात दरवर्षी वळवाचे पाऊस झाल्यावर धूळवाफेवर भात पिकाची पेरणी करतात. १२ जूननंतर झालेल्या पावसामुळे भाताच्या बियाणांची उगवण चांगली झाली होती. त्यामुळे पश्चिम पट्यातील निरादेवघर धरण भागातील हिर्डोशी खोऱ्यातील शेतकरी भाताच्या लागवडीला सुरवात केली होती. मात्र, मागील १५ दिवसांपासून पाऊस गायब होऊन चक्क ऊन पडले आहे. त्यामुळे भाताच्या लागवडी रखडल्या होत्या आणि लावलेले भात वाळायला सुरवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला होता.

दरम्यान, जवळजवळ १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर आज दीड वाजता पावसाला सुरवात झाली असून, असाच पाऊस कायम राहिल्यास भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील भाताच्या रखडलेल्या लागवडी पुन्हा सुरू होतील आणि पावसाआभावी भाताची रोपे पिवळे पडू लागली होती. मात्र, पाऊस सुरू झाल्याने भाताच्या रोपांना जीवदान मिळणार आहे.

तालुक्याचे पूर्व भागातील पुणे-सातारा महामार्गावरील आजूबाजूची गावे, भोंगवली भागातील गावे, विसगाव खोरे भागात भाताच्या बियाणांची पेरणी केली असून, भाताच्या रोपांची उगवण झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर भाताची लागवड करतात. मात्र, सध्या पाणी नसल्याने माळरानावरील तरवे करपू लागले आहेत. पावसाची परिस्थिती अशीच राहिल्यास दुबार पेरणीचे संकट येऊ शकत होते. मात्र, पाऊस सुरू झाल्याने भाताच्या लागवडी सुरू होणार आहेत.

भोर तालुक्यात खरीप पिकाखालील क्षेत्र २० हजार हेक्टर असून, भात हे प्रमुख पीक असून, सुमारे ७४०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. ५० हेक्टवर भाताच्या रोपांची पेरणी केली होती. भात हे प्रमुख पीक असून, यात हळव्या आणि गरव्या जातींच्या भाताची लागवड केली जात असून, गरव्या जातीत इंद्रायणी, बासमती, आंबेमोहर, पुसा बासमती तामसाळ, हळवे बारीक या जाती तर हळव्या जातीत रत्नागिरी २४, कर्जत १८४, सोनम इंडम फुले राधा या जातींच्या भाताची लागवड केली जाते. हळव्या जातीचे भात पीक ९० ते १०० दिवसांत तयार होते आणि त्याला पाणी कमी लागते. तर गरव्या जातीचे भात १०० ते १२० दिवसांत तयार होते. त्याला पाणी अधिक प्रमाणात लागते. तालुक्यात इंद्रायणी जातीच्या तांदळाला सर्वाधिक मागणी असून, भोर तालुक्यात ८० ते ९० टक्के इंद्रायणी भाताचीच सर्वाधिक लागवड केली जाते.

Web Title: The onset of rains has saved the lives of paddy plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.