पुणे महापालिकेच्या दवाखान्यातील ओपीडी 'बंद'च ; सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 11:49 AM2020-10-04T11:49:43+5:302020-10-04T11:51:20+5:30

खासगी डॉक्टरांकडे मोजावे लागतात शेकडो रुपये

OPD closed in pune municipal hospitals, problem for common patients | पुणे महापालिकेच्या दवाखान्यातील ओपीडी 'बंद'च ; सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड

पुणे महापालिकेच्या दवाखान्यातील ओपीडी 'बंद'च ; सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड

Next
ठळक मुद्देगेल्या सहा महिन्यांपासून महापालिकेच्या रूग्णालयातील ६९ ओपीडी बंद

पुणे : शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून गेल्या सहा महिन्यात महापालिकेच्या रुग्णालयांमधील सर्वच्या सर्व ६९ ओपीडी अर्थात बाह्य रुग्ण विभाग बंद ठेवण्यात आलेले आहेत. याठिकाणचे डॉक्टर आणि वैद्यकीय मनुष्यबळ कोरोनाच्या कामावर जुंपण्यात आल्याने या ओपीडी बंद ठेवण्याची वेळ आली आहे. ओपीडी बंद असल्यामुळे गोरगरीब नागरिकांना खासगी डॉक्टरांकडे शेकडो रुपये खर्च करून उपचार घ्यावे लागत आहेत. यासंदर्भात, पालिकेचे आरोग्य अधिकारी उदासीन असून ओपीडी सुरू करण्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे. 

शहरामध्ये 9 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर झपाट्याने कोरणा रुग्णांची संख्या वाढत गेली महापालिकेने शहराच्या विविध भागात विलगीकरण कक्ष आणि कोविड सेंटर उभे केले. या विलगीकरण कक्ष आणि कोविड सेंटरवर मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागल्यावर पालिकेच्या विविध रुग्णालयांमधील वैद्यकीय मनुष्यबळ याठिकाणी नेमण्यास सुरुवात केली. पालिकेच्यामार्फत चालविले जाणारे ७३ रुग्णालय पुण्यामध्ये आहेत. तर ६९  ठिकाणी ओपीडी अर्थात बाह्यरुग्ण विभाग आहेत. याठिकाणी गोरगरीब कष्टकरी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना उपचार मिळतात. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेले घटक या उपक्रमांमधून उपचार घेतात. अवघ्या एक रुपयामध्ये केस पेपर आणि उपचार याठिकाणी दिले जातात. 

महापालिकेच्या या वैद्यकीय सुविधेला कोरोना काळात खेळ बसला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आजार उद्भवल्यास किंवा आरोग्यासंबंधी तक्रारी असल्यास जायचे कुठे असा प्रश्न पडला आहे. लॉकडाऊनच्या काळात गोरगरीब कष्टकरी वर्गाची जगण्याची तारांबळ उडाली. याकाळात अनेकांचे रोजगार गेले. अनेकांना रोजचा दोनवेळच्या भाकरीची भ्रांत पडली. अशा काळात आजारपण आल्यास महापालिकेचा असलेला आधारही तुटला. नाईलाजास्तव नागरिकांना खाजगी डॉक्टरांकडे जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. खाजगी डॉक्टर शंभर रुपयांच्या खाली पैसे घेत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. साधारणपणे १०० ते ५०० रुपयांपर्यंतची बिल डॉक्टर घेतात. यासोबतच मेडिकलमधून आणण्यासाठी लिहून दिलेल्या औषधांचे पैसे अतिरिक्त खर्च करावे लागतात. ही औषधे महापालिकेच्या रुग्णालयात मोफत मिळतात. 

सर्वसामान्य नागरिकांना यामुळे भुर्दंड बसत आहे. पालिकेच्या ओपीडी सुरू करण्याची आवश्यकता असताना वैद्यकीय अधिकारी मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असताना दिसत आहेत. कोरोनामुळे आर्थिक कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांसाठी खर्च करावे लागणारे पैसे न परवडणारे आहेत. त्यामुळे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून ओपीडी तात्काळ सुरू करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

--//--- 

एकीकडे शहरातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे पालिकेने कोविड सेंटर पैकी आठ कोविड सेंटर तात्पुरते बंद केले आहेत. यासोबतच पूर्वीप्रमाणे खाटांची कमतरता भासत नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ज्या ठिकाणचे सेंटर बंद करण्यात आले आहेत किंवा वैद्यकीय सुविधा सुरळीत झाल्या आहेत अशा सेंटरवरील मनुष्यबळ कमी करून पालिकेच्या ओपीडी सुरू करण्याबाबत विचार करण्याची आवश्यकता आहे. 

 

Web Title: OPD closed in pune municipal hospitals, problem for common patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.