ओपन कॅँटीन होणार इतिहास जमा
By admin | Published: October 13, 2016 02:41 AM2016-10-13T02:41:14+5:302016-10-13T02:41:14+5:30
केवळ विद्यार्थी, प्राध्यापकच नाही, तर पुण्यातील शिक्षण, कला, सांस्कृतिक आदी क्षेत्रांतील नागरिकांशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ओपन कँटीनने
पुणे : केवळ विद्यार्थी, प्राध्यापकच नाही, तर पुण्यातील शिक्षण, कला, सांस्कृतिक आदी क्षेत्रांतील नागरिकांशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ओपन कँटीनने एक वेगळीच ‘अॅटॅचमेंट’ निर्माण केली होती. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने ओपन कँटीन बंद करून या जागेचा विकास करून बंदिस्त स्वरूपातील उपाहारगृह उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यापीठाच्या खेर वाङ्मय भवन व मुलींच्या वसतिगृहाजवळ अनेक वर्षांपासून ओपन कँटीन सुरू होती. गेल्या काही वर्षांपासून एक कंत्राटदार ही कँटीन चालवत होता. विद्यापीठाच्या हिरव्यागार नयनरम्य वातावरणात मोकळ्या जागी चहा आणि नाष्टा करण्याचा एक वेगळाच आनंद ओपन कँटीनमधून अनेकांनी घेतला.
विद्यापीठाच्या आवारात सकाळी व्यायाम करण्यासाठी येणारे ज्येष्ठ नागरिक व तरुण आवर्जुन या कँटीनमध्ये चहा घेत मित्रांबरोबर गप्पा मारत असत. विद्यार्थी व प्राध्यापकही मोकळ्या जागी तासन्तास बसून शिक्षण व संशोधनविषयक चर्चा करत असत.
ओपन कँटीनचा मूळ कंत्राटदारही तांबडे भोपळे, दुधी भोपळे, रंगीबेरंगी फुलांच्या झाडांनी ओपन कॅँटीन सजवत होता. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून ओपन कँटीनची दुरवस्था झाली होती. विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिकांकडून कँटीनविषयीच्या अनेक तक्रारी विद्यापीठ प्रशानाला प्राप्त झाल्या होत्या.
विद्यापीठाने निश्चित केलेल्या खाद्यपदार्थांच्या दरापेक्षा अधिक दर ओपन कँटीनमधील कर्मचारी वसूल करत होते. कँटीन चालकाकडून कोणालाही पिण्यासाठी साधे पाणीही दिले जात नव्हते. कँटीनच्या परिसरात प्रचंड अस्वच्छता होती. त्यातच कँटीन चालकाचे विद्यापीठाशी असलेल्या कराराची मुदत संपल्याने विद्यापीठाने ओपन कँटीन कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला. गेल्या १० ते १५ दिवसांपासून ही कँटीन बंद आहे.
आता याच जागेवर बांधकाम करून बंदिस्थ स्वरूपातील उपाहारगृह उभारले जाणार आहे. कँटीन बंद झाल्याने वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मात्र, त्यावर पर्यायीव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न विद्यापीठ प्रशानाकडून सुरू आहे. (प्रतिनिधी)