उघडे राेहित्रके ठरतायेत धाेकादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 08:55 PM2018-12-03T20:55:48+5:302018-12-03T20:57:51+5:30
शहरातील विविध भागांमध्ये अनेक उघडे राेहित्रके असल्याचे चित्र असून यामुळे रस्त्यावरुन चालणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धाेेका निर्माण झाला अाहे.
पुणे : उघड्या राेहित्रकामुळे (डिपी बाॅक्स) एका अायटी अभियंता मुलीचा जीव गेल्यानंतरही प्रशासन उघड्या राेहित्रकांच्या बाबतीत गंभीर नसल्याचे चित्र अाहे. शहरातील विविध भागांमध्ये अनेक उघडे राेहित्रके असल्याचे चित्र असून यामुळे रस्त्यावरुन चालणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धाेेका निर्माण झाला अाहे.
रस्त्यावरील राेहित्रकांचे दरवाजे बंद असणे अपेक्षित असताना सध्या शहरातील विविध भागांमधील राेहित्रकांची स्थिती पाहता एखादा अपघात घडण्याची शक्यता अाहे. लाेकमतने केलेल्या पाहणीत रामवाडी, बंडगार्डन, येरवडा, डेक्कन, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय या भागातील राेहित्रकांचे दरवाजे तुटलेले अाढळले. या राेहित्रकांमध्ये माेठा विद्युत प्रवाह असल्याने एखादी व्यक्ती या प्रवाहाच्या संपर्कात अाल्यास त्या व्यक्तीचा जीव जाण्याची शक्यता अाहे. तसेच या राेहित्रकामध्ये पाणी गेल्यास शाॅर्ट सर्किट हाेण्याची देखिल शक्यता अाहे. या राेहित्रकांवर अनेकदा जाहीराती लावल्या जातात. या जाहीराती लावणाऱ्यांवर देखिल कारवाई हाेत नाही. तसेच या राेहित्रकांवर नागरिकांसाठी धाेकादायक असल्याचे चिन्हही अनेकदा काढले जात नाही. त्यामुळे नागरिकांचे जीव गेल्यानंतर प्रशासन जागे हाेणार का असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत अाहेत.
येरवड्यात राहणारे विजय चव्हाण म्हणाले, शहरातील अनेक भागात असे उघडे राेहित्रके पाहायला मिळतात. वर्षभरापूर्वीच खराडी येथे उघड्या राेहित्रकाचा स्फाेट झाल्याने एका अायटी अभियंत्या तरुणीचा जीव गेला हाेता. त्याचबराेबर पथदिव्यांना अार्थिन नसल्यामुळे एका बालकाचे प्राण गेल्याची घटना सुद्धा वारज्यात समाेर अाली हाेती. या घटना घडूनही प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळते अाहे. प्रशासनाने लवकरात लवकर उघडे राेहित्रके दुरुस्त करणे अावश्यक अाहे.