खुल्या मैदानावरील लावणी कार्यक्रमांना परवानगी मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:06 AM2021-01-01T04:06:38+5:302021-01-01T04:06:38+5:30
पठ्ठे बापुराव प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक कला मंडळातर्फे २ जानेवारी रोजी ‘अहो नादच खुळा’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. यानिमित्ताने ...
पठ्ठे बापुराव प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक कला मंडळातर्फे २ जानेवारी रोजी ‘अहो नादच खुळा’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. यानिमित्ताने तब्बल दहा महिन्यांनी लावणी कलावंतांसाठी रंगमंचाचा पडदा उघडणार आहे. या पार्श्वभूमीवर लावणी लोककला निर्माता संघाचे उपाध्यक्ष शशिकांत कोठावळे, लावणी सम्राज्ञी माया खुटेगावकर, कलाकार संगीता लाखे आणि अर्चना जावडेकर यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी लावणी कलावंतांच्या समस्या, पुढील कार्यक्रमांचे नियोजन अशा विविध मुद्दयांना स्पर्श केला.
खुटेगावकर म्हणाल्या, ‘जत्रा, यात्रांमध्ये लावणीच्या कार्यक्रमांना रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र, अद्याप त्या कार्यक्रमांना शासनाने परवानगी दिलेली नाही. ती परवानगी मिळाल्यास कार्यक्रम वाढू शकतील. कलाकारांचा उदरनिर्वाह होऊ शकेल.’ सध्या प्रेक्षकांची अभिरुची बदलली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, ‘प्रेक्षकांना कार्यक्रमात वैविध्य हवे असते. त्यामध्ये काही लावण्या, काही हिंदी गाणी असे बदल प्रेक्षकांच्या आवडीनुसार केले जातात. शासनाकडून लावणी कलावंतांना मानधनही मिळावे, अशी अपेक्षा आहे.’
---
सध्या नाट्यगृहांना परवानगी मिळाली असली तरी ५० टक्के प्रेक्षकच कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात. लावणीसारख्या लाईव्ह कार्यक्रमांना प्रेक्षकांना मागे बसणे रुचत नाही. आम्ही हॉटेलमध्ये एकत्र जातो, गाडीतून एकत्र प्रवास करतो, मग नाट्यगृहांमध्येच शेजारी का बसू शकत नाही, असा सवाल उपस्थित केला जातो.
- शशिकांत कोठावळे
--
कोरोना काळात कलावंतांना सहकार्य करणाऱ्यांचा करणार सन्मान
लावणी सम्राज्ञी माया खुटेगावकर यांच्या ‘अहो नादच खुळा’ या कार्यक्रमाचे २ जानेवारी रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी १२.४५ वाजता आयोजन केले आहे. यानिमित्त कलावंतांचा सन्मान आणि कोरोना काळामध्ये कलावंतांना सहकार्य करणा-या रसिकांना प्रातिनिधिक स्वरुपात सन्मान करणार आहे.