मुळशीत माती माफियांकडून खुलेआम लूट, प्रशासनाची डोळेझाक; संवेदनशील क्षेत्रातील गावामधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 11:11 AM2024-04-05T11:11:35+5:302024-04-05T11:12:34+5:30

एवढं सगळं घडत असताना मात्र महसूल विभाग याकडे डोळेझाक करत असल्याचे समोर आले आहे. उत्खननामुळे संवेदनक्षेत्रातील जैवविविधता धोक्यात आली आहे.....

Open looting by soil mafias in Mulshi, administration turning a blind eye; Type in village in sensitive area | मुळशीत माती माफियांकडून खुलेआम लूट, प्रशासनाची डोळेझाक; संवेदनशील क्षेत्रातील गावामधील प्रकार

मुळशीत माती माफियांकडून खुलेआम लूट, प्रशासनाची डोळेझाक; संवेदनशील क्षेत्रातील गावामधील प्रकार

- दुर्गेश मोरे

पुणे : मुळशी तालुक्यातील संवेदनशील क्षेत्रात (इको सेन्सिटिव्ह झाेन) असणाऱ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात लाल मातीचे उत्खनन सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे माती घेऊन जाण्यासाठी टेमघर धरणातून मार्ग काढण्यात आला आहे. एवढं सगळं घडत असताना मात्र महसूल विभाग याकडे डोळेझाक करत असल्याचे समोर आले आहे. उत्खननामुळे संवेदनक्षेत्रातील जैवविविधता धोक्यात आली आहे.

पश्चिम घाट ही देशाला मिळालेले वरदान असून, या डोंगररागांमध्ये असंख्य प्रकारची वनसंपदा, वन्यजीव, कीटक, सरपटणारे प्राणी आणि सूक्ष्म जीव आहेत. अनेक नद्यांचा उगम होत असल्याने तेथील वनक्षेत्र जैवविविधतेने समृद्ध आहे. ही जैवविविधता टिकून राहण्यासाठी शासनाने संवेदशील क्षेत्र जाहीर केले आहेत. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील तब्बल ३३९ गावांचा संवेदनशील क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे. असे असतानाही गेल्या काही दिवसांत उत्खनन, खाणी, अतिक्रमणे, वृक्षतोड, बांधकाम आणि पर्यावरणासाठी धोकादायक ठरणाऱ्या प्रकल्प वाढले आहेत. विशेष करून मुळशी, वेल्हे तालुक्यांमध्ये गौण खनिज, लाल मातीचे बेसुमार उत्खनन सुरू आहे. त्यामुळे तेथील धोक्यात आले आहे.

मुळशी तालुक्यातील ६६ गावांचा संवेदनशील क्षेत्रामध्ये समावेश आहे. असे असतानाही काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन सुरू आहे. तर काही ठिकाणी वृक्षतोडही करण्यात आली आहे. टेमघर, लव्हार्डे, कोळवडे, वेगरे ही गावे संवेदनशील क्षेत्रात आहेत. वेगरे गाव जेमतेम लोकसंख्येचे. मात्र, गावात बिनभोभाटपणे रात्रंदिवस मातीचे उत्खनन सुरू आहे. उत्खनन केल्यावर नियमानुसार वाहतूक करताना माती उडू नये याची खबरदारी घेणे गरजेचे होते. पण याला तिलांजली देत वाहतूक होत असते. रस्ता खराब झाल्याने गावकऱ्यांनी या वाहतुकीला विरोध केला होता. त्यानंतर काही दिवस काम बंद झाले. अखेर शक्कल लढवत मातीचोरांनी चक्क टेमधरणातूनच नवा मार्ग तयार करून आपले काम पुन्हा सुरू केले.

परवाना एका गटाचा उत्खनन दुसऱ्या गटात

उत्खनन करण्यासाठी तो परिसर खाणपट्टा म्हणून घोषित करणे आवश्यक असते. त्यानंतर पर्यावरण आघात मूल्यांकन समिती, ग्रामंपचायतीचे नाहकरत प्रमाणपत्र घेणे गरजेचे असते. मात्र, असे असतानाही नियमांना धाब्यावर बसवले जाते. परवाना घेताना एका गटाचा घेतला जातो उत्खनन मात्र दुसऱ्या गटात केले जाते. ग्रामसेवक, तलाठी यांना याची माहिती मिळत नाही याचे आश्चर्य व्यक्त केले जाते. वेगरे गाव संवेदनशील क्षेत्रात येत असतानाही तेथे उत्खनन सुरू आहे. गावकऱ्यांनी विरोध केल्यानंतर परवानगी मिळाली असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सरपंच यांच्या जागेत उत्खनन सुरू असल्याचे सांगत अरेरावीदेखील मातीचोरांनी ग्रामस्थांना केली. मग दाद कुठे मागायची? असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे.

महसूल विभागाने डोळे झाकण्यामागे काय आहे गौडबंगाल

वीटभट्टी, बगीचा, मैदान तसेच शेतीसाठी लाल मातीचा उपयोग होते. मुळशी तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी विशेष करून संवेदनशील क्षेत्रात माती उत्खनन केले जात असूनही तहसील कार्यालयाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे महसूल विभागाने डोळे झाकण्यामागे काय गौडबंगाल आहे हे मात्र समजायला काही एक मार्ग नाही. केवळ मुळशीच नाही तर वेल्ह्यातही असे प्रकार सुरू आहेत.

पुणे जिल्ह्यातील संवेदनशील क्षेत्र

तालुका-- गावे

मुळशी-- ६६

वेल्हे-- ५८

भोर-- ५६

मावळ-- ५३

आंबेगाव-- ३७

जुन्नर-- ३५

खेड-- २२

पुरंदर-- ८

हवेली-- ४

संवेदनशील क्षेत्रात उत्खननाला परवानगी देता येत नाही. तसे काही असेल तर तक्रार करावी. संवेदनशील क्षेत्रातील गावात जर माती उत्खनन सुरू असेल तर तत्काळ कारवाई करण्यात येईल. शिवाय इतर ठिकाणी सुरू असलेल्या उत्खननाची माहिती घेऊन नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कारवाई करू.

- सुयोग जगताप, जिल्हा खणिकर्म अधिकारी

पिरंगुट, मुळशी या भागात मोठ्या प्रमाणात लाल मातीचा उपसा चालू असतो. यामध्ये कोणत्याही प्रकारची परवानगी नाहीये आणि ज्या गावांमध्ये परवानगी दिलेली आहे. त्या गावात खोदकाम न करता दुसऱ्या गावांमध्ये खोदकाम केलं जातं आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावरत प्रशासकीय विभागाची फसवणूक केली जाते. यावर प्रशासनाने विभागाने कारवाई करावी.

-अंकुश दिवटे

वेगरे गाव संवेदनशील क्षेत्रात (इको सेन्सिटिव्ह झोन) येत असूनही तेथे माती उपसा चालू आहे. मातीची रात्रंदिवस टेमघर धरणातून वाहतूक सुरू असतानादेखील महसूल विभाग गप्पा का बसला आहे हे मात्र समजत नाही. वरिष्ठांची याची दखल घेणे गरजेचे आहे.

-विनोद कांबळे

Web Title: Open looting by soil mafias in Mulshi, administration turning a blind eye; Type in village in sensitive area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.