सेन्सॉर बोर्डाचा दुर्मिळ खजिना अभ्यासकांसाठी खुला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 09:53 PM2019-04-03T21:53:37+5:302019-04-03T21:54:35+5:30
हे माहिती आहे का? की डेक्कन पिक्चर्स कॉर्पोरेशनने 1924 मध्ये‘पूना रेडेड’ हा मूकपट निर्मित केला होता आणि त्याचे दिग्दर्शन मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध नाटककार मामा वरेरकर यांनी केले होते.
पुणे : हे माहिती आहे का? की डेक्कन पिक्चर्स कॉर्पोरेशनने 1924 मध्ये‘पूना रेडेड’ हा मूकपट निर्मित केला होता आणि त्याचे दिग्दर्शन मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध नाटककार मामा वरेरकर यांनी केले होते. वरेरकरांनी या चित्रपटात मुघल सेनापती शाहिस्तेखान हा जेव्हा छत्रपती शिवाजीमहाराजांवर हल्ला करायला जातो, तेव्हा शाहिस्तेखानाला शिवाजी महाराजांच्या कपाळावर चंद्रकोर दिसते. शिवाजी महाराजांना शैतान कसं म्हणू शकतो? हा तर शिवाचा अवतार आहे अशा शब्दातं शिवाजीमहाराजांची मुक्तकंठाने प्रशंसा करणारा प्रसंग समाविष्ट केला होता. मात्र भारतीय स्वातंत्र्याच्या पाशर््वभूमीवर साम्राज्यशाहीविरूद्धातील हे रूपक असल्याचे मानून बॉम्बे बोर्ड आॅफ सेन्सॉरने हा प्रसंग वगळून 15 आॅगस्ट 1924 ला डेक्कन पिक्चर्स कॉर्पोरेशनला सेन्सॉरचे प्रमाणपत्र दिले होते. अशा सेन्सॉर बोर्डाच्या जवळपास 2500 पानांच्या नोंदीचा दुर्मिळ खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने अभ्यासक आणि संशोधकांसाठी
संकेतस्थळावर खुला केला आहे.
दिवंगत सिसिल बी डी मिले यांनी दिग्दर्शित केलेल्या ’द व्होल्गा बोटमन’ या अमेरिकन मूकपटाला देखील सेन्सॉरने कात्री लावली होती.रशियातील बोलशेविक क्रांतीशी संबंधित हा चित्रपट असून, तो वर्णद्वेष, हिंसाचार, लालसा आणि क्रूरता अशा गोष्टींना खतपाणी घालणारा असल्याने बॉम्बे बोर्ड आॅफ सेन्सॉरने या चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र देण्यास
नकार दर्शविला होता. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय चित्रपट सृष्टीशी संबंधित अशा अनेक गोष्टींची माहिती या नोंदीमधून अभ्यासक आणि संशोधकांना उपलब्ध होणार असल्याची माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिली. 1920 ते 1950 दरम्यान बॉम्बे आणि बंगाल सरकारच्या राजपत्रामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय चित्रपट सृष्टीशी संबंधित नोंदींचा उल्लेख देखील पाहायला मिळतो. चित्रपट पूर्ण झाल्यानंतर सेन्सॉर बोर्डाकडे तपासणी आणि सर्टिफिकेटसाठी पाठविण्यात आलेल्या चित्रपटांच्या नोंदी आहेत. जवळपास या 2500 पानांच्या नोंदीएनएफएआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये चित्रपट तपासणी, रिळांची संख्या, कंपनीचे नाव, मूळचा देश, तपासणीची आणि सर्टिफिकेट दिल्याची तारीख या माहितीचा नोंदीमध्ये समावेश असल्याचे
त्यांनी सांगितले.
प्रकाश मगदूम,संचालक, एनएफएआय
’’ स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय चित्रपट आणि चित्रपट सृष्टीशी संबंधित या नोंदी म्हणजे एक ऐतिहासिक दस्तावेज आहे. ज्यांना
स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय चित्रपटांमध्ये रस आहे अशा जगभरातील चित्रपट संशोधकांना हा माहितीचा खजिना उपयुक्त ठरणार आहे.