रेशनच्या गव्हाचा काळाबाजार उघडकीस
By admin | Published: June 17, 2016 05:18 AM2016-06-17T05:18:07+5:302016-06-17T05:18:07+5:30
रेशनवरच्या तब्बल २00 पोती गव्हाचा काळाबाजार करणाऱ्या तिघा जणांना खडक पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिसांनी २ लाख ९ हजारांचा गहू जप्त केला असून, अन्न व पुरवठा विभागाच्या
पुणे : रेशनवरच्या तब्बल २00 पोती गव्हाचा काळाबाजार करणाऱ्या तिघा जणांना खडक पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिसांनी २ लाख ९ हजारांचा गहू जप्त केला असून, अन्न व पुरवठा विभागाच्या वतीने फिर्याद दाखल करण्यात आली आहे. मागील आठवड्यामध्ये औंध येथील खाणीत शेकडो पोती गहू फेकून देण्यात आल्याची घटना ताजी असतानाच असा दुसरा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली.
शंकर गायकवाड, अजय मटकर, गोकुळ साबळे (सर्व रा. पुणे) असे अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकारी उज्ज्वला सांगळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकरशेठ रस्त्यावरच्या रेल्वे आरक्षण केंद्रासमोरील मोकळ्या जागेमध्ये आडोशाला काही लोक टेम्पोमधील धान्याची पोती एका ट्रकमध्ये भरत असल्याची माहिती खडक पोलिसांना मिळाली होती. युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोरपडे पेठेमध्ये एक टेम्पो आणि ट्रक अडवला. या वाहनांची तपासणी केल्यावर त्यामध्ये शासकीय शिक्का असलेली तब्बल २00 पोती गहू आढळून आला. पोलिसांनी पंचनामा केला.
अन्न व पुरवठा विभागाच्या सहायक अधिकारी सुचित्रा आमले पाटील, पुरवठा निरीक्षक स्मिता दत्तात्रय जोशी, रोहिणी शशांक गुप्ते यांनी गव्हाची पाहणी केली.