कुरणवस्ती रस्ता वाहतुकीसाठी खुला
By Admin | Published: May 12, 2014 03:41 AM2014-05-12T03:41:00+5:302014-05-12T03:41:00+5:30
गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला आंबेठाण येथील कुरणवस्ती (सोळबन) या पुनर्वसित गावाकडे जाणारा रस्ता खुला करण्यात आला असून, त्यामुळे ग्रामस्थांचा प्रवासाचा मार्ग सुकर झाला आहे.
आंबेठाण : गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला आंबेठाण (ता. खेड) येथील कुरणवस्ती (सोळबन) या पुनर्वसित गावाकडे जाणारा रस्ता खुला करण्यात आला असून, त्यामुळे सोळबनवासीय ग्रामस्थांचा प्रवासाचा मार्ग यापुढे सुकर झाला आहे. आंबेठाण गावाच्या उत्तरेला सोळबन नावाची लोकवस्ती आहे. मावळ तालुक्यातील पवनानगर धरणासाठी जमिनी गेल्याने येथील लोक खेड तालुक्यातील आंबेठाण आणि वासुली येथे विस्थापित झाले होते. पुनर्वसन झाल्यापासून सोळबन येथील नागरिकांना सोयी-सुविधांसाठी झगडावे लागत होते. या वस्तीकडे जाण्यासाठी गावाच्या उत्तरेला असणार्या तळ्यापासून रस्ता होता. परंतु, सध्या जमिनीला आलेल्या लाखमोलाच्या भावामुळे रस्त्यासाठी जमीन देण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध होता. त्यामुळे सोळबनकडे जाण्यासाठी नागरिकांना बोरदरा रस्त्याचा वापर करून दूरवरून जावे लागत होते. यामुळे कामगार, शालेय विद्यार्थी आणि शेतकर्यांचे प्रचंड हाल होत होते. विशेषत: त्यांचा खूप वेळ प्रवासातच जात असे. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन नव्याने निवडून आलेले सरपंच अशोक मांडेकर यांनी ग्रामसभेत हा विषय घेतला आणि ग्रामस्थांसमवेत चर्चा केली. ज्या लोकांच्या शेतामधून रस्ता जात होता, अशा शेतकर्यांच्या वतीने तंटामुक्तीचे उपाध्यक्ष दिलीप नाईकनवरे यांनी अडचणी मांडल्या. परंतु, सोळबन ग्रामस्थांना होणारा त्रास पाहून या ग्रामस्थांनी आपला विरोध कमी केला आणि तात्पुरत्या स्वरूपात का होईना, हा रस्ता सोळबन ग्रामस्थांसाठी खुला केला. तात्पुरत्या स्वरूपात का होईना, रस्ता खुला झाल्याने सोळबनवासीय ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, हाच रस्ता कायमस्वरूपी वापरण्यास मिळावा, अशी आग्रही मागणीही केली. याप्रसंगी सरपंच अशोक मांडेकर, सविता नाईकनवरे, गणेश मांडेकर, जालिंदरभाऊ मांडेकर, यात्रा कमिटीचे ज्ञानेश्वर भाऊ मांडेकर, माजी सरपंच व विद्यमान सदस्य सुभाष मांडेकर, दिलीप नाईकनवरे, नामदेव नाईकनवरे उपस्थित होते. (वार्ताहर)