नादच खुळा...पुन्हा ढोलकीचा ताल आणि घुंगराचे बोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:13 AM2021-01-03T04:13:42+5:302021-01-03T04:13:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तिसरी घंटा झाली. रंगमंचाचा पडदा उघडला...आणि तब्बल दहा महिन्यांनी समोर मायबाप रसिकांची गर्दी पाहून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तिसरी घंटा झाली. रंगमंचाचा पडदा उघडला...आणि तब्बल दहा महिन्यांनी समोर मायबाप रसिकांची गर्दी पाहून लावणी नृत्यांगनांच्या घुंगरांमध्ये उत्साह संचारला. ढोलकीची थाप जोरकस पडली. प्रेक्षकांच्या शिट्ट्यांनी बालगंधर्व रंगमंदिर दणाणून गेले.
मार्च २०२० नंतर पहिल्यांदाच पुण्यात ‘अहो नादच खुळा’ हा बहारदार लावणी कार्यक्रम शुक्रवारी (दि. २) रंगला. त्यावेेळचे हे दृष्ट होते. पठ्ठे बापूराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयप्रकाश वाघमारे, कार्याध्यक्ष सत्यजीत खांडगे, ‘संवाद’चे सुनील महाजन, निर्माते शशी कोठावळे, डॉ शंतनू जगदाळे, आप्पा झांबरे आदी यावेळी उपस्थित होते. टाळेबंदीच्या काळात लावणी कलावंतांना अन्नधान्याची मदत करणाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
माया खुटेगावकर, संगीता लाखे, अर्चना जावळेकर, साक्षी पुणेकर, प्राची मुंबईकर, स्वाती शिंदे या लावणी नृत्यांगनांच्या घुंगराच्या बोलांनी आणि मोहक अदांनी प्रेक्षागृह डोक्यावर घेतले. अमर वाघमारे, अभिजीत राजे अशा विविध कलावंतांनी त्यांना साथ दिली. ‘विचार काय हाय तुमचा, हो पाहून कवडसा चांदाचा पडला’, ‘कसं काय पाटील बरं हाय का’, ‘या होऊ द्या हो दिलाचा दिलबरा’ अशा विविधरंगी लावण्यांची उधळण या कलावंतांनी केली. तब्बल दहा महिन्यांनी घुंगरांचे बोल ऐकायला मिळाल्याचा आनंद प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
ज्येष्ठ लावणी नृत्यांगना माया खुटेगावकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, “आजच्या कार्यक्रमाचा आनंद शब्दांत व्यक्त करू शकत नाही. प्रेक्षकांच्या टाळ्या, शिट्या ऐकायला आम्ही आतूर झालो होतो. कधी एकदा पायात घुंगरू बांधतोय असं आम्हाला झालं होतं. नाट्यगृहांचा पडदा उघडला असला तरी प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतोय याची चिंता होती. पण प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिल्याने आम्हाला आत्मविश्वास मिळाला.”