ज्ञानवृक्षाखाली ‘समअवसरण’; भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या आवारात साकारतंय ज्ञान-स्थान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 04:19 AM2020-10-09T04:19:29+5:302020-10-09T04:19:36+5:30

उत्पन्नाची साधने निर्माण करताना पूर्णपणे व्यावसायिकीकरण होणार नाही, याचीही काळजी घ्यायची होती. त्यातूनच खुल्या रंगमंचाची कल्पना पुढे आली.

open stage at bhandarkar prachya vidya | ज्ञानवृक्षाखाली ‘समअवसरण’; भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या आवारात साकारतंय ज्ञान-स्थान

ज्ञानवृक्षाखाली ‘समअवसरण’; भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या आवारात साकारतंय ज्ञान-स्थान

Next

- अभय फिरोदिया, अध्यक्ष, नियामक मंडळ, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर

प्राचीन संस्कृतीचा अभ्यास आणि इतिहासाचे संशोधन यासाठी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर या संस्थेने जगभरात नावलौकिक मिळवला आहे. प्राच्यविद्येच्या क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातील संशोधकांच्या ज्ञानाची भूक भागविणारी भांडारकर प्राच्यविद्या संस्था केवळ पुण्याचाच नव्हे, तर देशाचा मानबिंदू आहे. संस्थेचे शताब्दी वर्षही नुकतेच साजरे झाले. संस्थेचे उत्पन्न कसे वाढवावे, याबद्दल नियामक मंडळामध्ये नेहमी विचारविनिमय होत असतो. संस्थेचा इतिहास उज्ज्वल आहे, उद्दिष्टेही उच्च आहेत. अनेक विद्वानांनी येथे कार्य केले आहे. परंतु, संस्थेला उत्पन्नाची फारशी साधने नाहीत. त्यामुळे त्यादृष्टीने काय केले पाहिजे, याबाबत चर्चा झाली. उत्पन्नाची साधने निर्माण करताना पूर्णपणे व्यावसायिकीकरण होणार नाही, याचीही काळजी घ्यायची होती. त्यातूनच खुल्या रंगमंचाची कल्पना पुढे आली.

मी संस्थेच्या नियामक मंडळाचा अध्यक्ष या नात्याने खुल्या रंगमंचाची कल्पना मांडली आणि सर्व सदस्यांनी ती मान्यही केली. भांडारकर संस्थेचा परिसर अतिशय विस्तीर्ण आणि सुंदर आहे. एक एकर जागेच्या मोकळ्या परिसरात एक प्राचीन वटवृक्ष दिमाखात उभा आहे. या परिसरात खुला रंगमंच साकारण्याचे निश्चित झाले. रंगमंचाचा संपूर्ण खर्च श्री फिरोदिया ट्रस्टच्या माध्यमातून केला जाणार आहे. माझ्या आजोबांनी १९४७ पासून ट्रस्टची स्थापना केली. सध्या मी ट्रस्टचा अध्यक्ष आहे. शैक्षणिक संस्थेला मदत करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. खुल्या रंगमंचाचे डिझाइन नचिकेत पटवर्धन यांनी केले आहे. संकल्पनेला साकारण्यात नचिकेतचा मोठा वाटा आहे. भांडारकर संस्थेतील खुल्या रंगमंचामध्ये शास्रीय संगीताच्या मैफिली, भाषणे, शैक्षणिक उपक्रम, सेमिनार्स असे लहान-मोठे कार्यक्रम होऊ शकतात. हे अ‍ॅम्फिथिएटर दोन-तीन भागांमध्ये विभागले जाणार आहे. खुल्या रंगमंचाचे बांधकाम लवकरच पूर्णत्वास जाईल. बांधकामासाठी वनविभाग, महापालिका, हेरिटेज विभाग आदी परवानग्या मिळवताना खूप अडचणी आल्या. त्यानंतर पावसाळा, आता कोरोनाचे संकट यामुळे काम पूर्ण होण्यास तीन-चार वर्षे लागली. याचवर्षी अर्थात २०२० मध्ये काम पूर्ण होईल, अशी आमची मनीषा आहे आणि ते होईल, अशी अपेक्षाही! पुण्यातील ज्ञानमार्गी समाजाला या निमित्ताने कार्यक्रमासाठी एक अद्भुत जागा मिळू शकेल आणि खुला रंगमंच मैलाचा दगड ठरेल, हे नक्की!

‘समअवसरण’ म्हणजे काय?
खुल्या रंगमंचाचे नामकरण ‘समअवसरण’ असे करण्यात येणार आहे. जैन परंपरा आणि बुद्ध परंपरा या श्रमण परंपरेतून आलेल्या आहेत. श्रमण परंपरा ही अतिप्राचीन आहे. या परंपरेमध्ये २४ तीर्थंकर अर्थात ज्ञानी पुरुष होऊन गेले. प्रत्येक तीर्थंकराचा ‘समअवसरण’ हा कार्यक्रम होऊन गेला आहे. यामध्ये एका उंचवट्यावर मध्यभागी तीर्थंकर असतात आणि विविध पायऱ्यांवर प्राणिमात्र असतात. ‘समअवसरण’ अर्थात सर्वांना ज्ञान मिळवण्याची, ऐकण्याची समान संधी. जैन परंपरेतील हे एक पवित्र प्रतीक आहे. ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तीर्थंकरांनी ‘समअवसरण’ केले. त्यामध्ये सर्वांना समान संधी मिळाली. ज्ञानेश्वरीमध्येही संत ज्ञानेश्वरांनी ‘प्राणिमात्र’ असाच शब्द वापरला आहे. याचाच अर्थ सर्व जिवांना समान संधी मिळाली आहे. म्हणूनच भांडारकर संस्थेतील खुल्या रंगमंचाला ‘समअवसरण’ हे नाव देण्याचे निश्चित केले आहे. येथून ज्ञानदर्शन, सत्यदर्शन या अर्थाने हे नाव उचित आहे, असे मला वाटले आणि आमच्या समितीने ते मान्यही केले.

Web Title: open stage at bhandarkar prachya vidya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.