राज्यातील मंदिरं उघडा; पुरोहितांचं मुख्यमंत्र्यांना साकडं, तीर्थक्षेत्री असणाऱ्यांवर आर्थिक संकट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 11:30 AM2021-09-02T11:30:06+5:302021-09-02T11:30:53+5:30
शासनाकडून आर्थिक मदत मिळावी व मंदिरे लवकर खुली करावीत अशी पुरोहितांची मागणी
भीमाशंकर : महाराष्टातील मंदिरे कोरोना महामारीमुळे गेली अठरा महिने बंद आहेत. तसेच सर्व प्रकारे धार्मिक कार्यक्रम देखील बंद आहेत. त्यामुळे राज्यातील पुरोहित वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. यासाठी पुरोहितांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी व मंदिरे लवकर खुली करावीत अशी मागणी अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभाचे पुणे विभाग मंत्री वेदमुर्ती मधुकरशास्त्री गवांदे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन पाठवून त्यांनी ही मागणी केली आहे. गेल्या अठरा महिन्यांपासून संपूर्ण मंदिरं बंद आहेत. या लॉकडाऊन काळात आपण दुकाने, नोकरवर्ग, छोटे मोठे व्यवसाईक अशा घटकास व्यवसायासाठी निर्बंध टाकून मुभा दिल्या आहेत. परंतु महाराष्ट्रातील गावोगावी असलेली मंदिरं उघडण्यास तसेच दर्शनासाठी, धार्मिक विधी करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे भाविक मंदिरास दर्शनासाठी व धार्मिक विधीसाठी येऊ शकत नाहीत.
पुरोहितांना शासनाकडून अथवा मंदिर संस्थांना सांगून मदत देण्याचे आदेश काढा
राज्यातील गावोगावी छोटयामोठया तीर्थक्षेत्री असलेल्या पुरोहितांवर आर्थिक संकट आले आहे. सर्व पुरोहितवृंद मंदिरे उघडण्याची वाट पाहत आहेत. त्यात तीस-या लाटेचे संकट येणार असल्याचे सांगितले जात आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या पुरोहितांना शासनाकडून अथवा मंदिर संस्थांना सांगून मदत देण्याचे आदेश आपणाकडून निघावेत. तसेच लवकरात लवकर दुकानदारांप्रमाणे निर्बंध टाकून मंदिरे उघडण्यास परवानगी दयावी अशी मागणी वेदमुर्ती श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे उपकार्यकारी विश्वस्त मधुकरशास्त्री गवांदे यांनी केली आहे.