बालभारतीचा पुस्तक छपाईचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:09 AM2021-06-17T04:09:36+5:302021-06-17T04:09:36+5:30
पुणे : बालभारतीच्या पुस्तक छपाईसाठी लागणा-या कागदासंदर्भातील न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका निकाली काढण्यात आली आहे. त्यामुळे बालभारतीच्या पुस्तक ...
पुणे : बालभारतीच्या पुस्तक छपाईसाठी लागणा-या कागदासंदर्भातील न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका निकाली काढण्यात आली आहे. त्यामुळे बालभारतीच्या पुस्तक छपाईचा मार्ग आता मोकळा झाला आहे. परिणामी सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी मोफत पुस्तके लवकरच त्यांच्या हातात पडतील, असा विश्वास बालभारतीच्या अधिका-यांकडून व्यक्त केला जात आहे.
राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना राज्य शासनातर्फे मोफत पुस्तके वितरीत केली जातात. त्यासाठी बालभारतीकडून विविध माध्यमांची सुमारे नऊ कोटी पुस्तके छापली जातात. मात्र, कागद खरेदीबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे तब्बल दोन कोटी पुस्तके बालभारतीला छापता आली नाही. त्यातच शिक्षण विभागाने मागील वर्षी विद्यार्थ्यांना वाटण्यात आलेली पुस्तके जमा करून घेण्याबाबत शाळांना सूचना दिल्या होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना जुनीच पुस्तके मिळणार, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू झाली होती. परंतु, पुस्तकांसाठी लागणा-या कागदाबाबत प्रश्न आता सुटला आहे. बालभारतीकडून उर्वरित पुस्तक छपाईचे काम आता हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे उशिरा का होईना विद्यार्थ्यांना पुस्तके मिळणार आहेत.
बालभारतीचे संचालक दिनकर पाटील म्हणाले, पुस्तक छपाईसाठी लागणा-या कागदावरील याचिका न्यायालयाने निकाली काढली आहे. त्यामुळे लवकरच उर्वरित पुस्तकांची छपाई सुरू केली जाईल. बालभारतीने काही पुस्तकांची छपाई केली आहे. परंतु, त्यावर मुखपृष्ठ लावण्यासाठी कागद उपलब्ध नव्हता. आता तो कागदही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी लागणारी सर्व पुस्तके छापली जातील.