एकाच पुलाचे दोनदा उद्घाटन
By admin | Published: May 29, 2017 02:56 AM2017-05-29T02:56:06+5:302017-05-29T02:56:06+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेत श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले आहे. सांगवी फाटा येथे बांधलेल्या जोतिबा फुले उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटरच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले आहे. सांगवी फाटा येथे बांधलेल्या जोतिबा फुले उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटरच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न टाकल्यामुळे राष्ट्रवादीने शनिवारी उद्घाटन केले. तर रविवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवी प्रभाग क्रमांक ३१ मधील सांगवी फाटा येथील महात्मा जोतिबा फुले उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटर तयार केला आहे. निवडणुकीपूर्वी तयार झालेला पूल गेली तीन महिने सुरू केला नव्हता. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांनी आवाज उठविला होता. महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्यामुळे भाजपाने या पुलाचे उद्घाटन लांबणीवर टाकले होते. पुलाबाबत नागरिकांकडून मागणी होत असल्याने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन करण्याचे नियोजन केले. मात्र, पत्रिकेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव टाकले नाही. पंरतु, भाजपा आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांची नावे टाकली. त्यामुळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी शनिवारी हा पूल वाहतुकीसाठी खुला केला. याबाबत शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी भाजपावर टीका केली. त्यानंतर रविवारी राष्ट्रवादीने उद्घाटन केलेल्या पुलाचे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मानापमान रंगले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. याबाबत ठाकरेंचे तैलचित्र लावताना शिवसेनेला बाजूला ठेवल्याचा आरोप केला आहे. तसेच कार्यक्रमात शिवसेनेच्या नेत्यांनाही फारशे स्थान दिले नाही. व्यासपीठावर संघ आणि भाजपाचेच नेते अधिक होते. प्रोटोकॉलनुसार खुर्च्या मांडलेल्या नव्हत्या. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे मत व्यक्त करणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांचे नाव कापण्यात आले. पालकमंत्री गिरीश बापट यांचे भाषण होण्यापूर्वी बारणे यांनी माईक हातात घेऊन मनोगत व्यक्त केले. ही बाब लक्षात येताच तावडे आणि बापट यांनी स्थानिक नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे कान टोचले. राजकारणात मतभेद असावेत मनोभेद असू नयेत. राजकीय अस्पृशता असू नये, असे कान टोचले.