दारूची दुकाने उघडताच वाढली शहरात गुन्हेगारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:16 AM2021-08-18T04:16:49+5:302021-08-18T04:16:49+5:30
पुणे : लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद असल्याने शासनाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली. त्यात कोरोनामुळे खर्च वाढला. अशावेळी ...
पुणे : लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार बंद असल्याने शासनाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली. त्यात कोरोनामुळे खर्च वाढला. अशावेळी उत्पन्नासाठी शासनाने सर्वात अगोदर दारूची दुकाने उघडण्यास परवानगी दिली. सुरुवातीच्या काळात दुकानांसमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे दृश्यही सर्वांनी पाहिले. त्यातून कोरोनाचे आर्थिक वॉरियर म्हणूनही या प्रकाराची मोठ्या प्रमाणावर चष्टेचा विषयही झाला होता. मात्र, दारू दुकाने उघडल्यानंतर शहरातील गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
दारूची दुकाने उघडली तरी बिअर बार, परमिट रूम यांना सुरुवातीला परवानगी नव्हती. त्यामुळे दारू मिळाली तरी ती पिण्यासाठीचे हॉटेल बंद असल्याने रस्त्याच्या कडेला, आडबाजूला बसून दारू पिण्याचे प्रमाण वाढले. दारू पिताना वादावादी होऊन त्याचे पर्यावसन मारामारी, एकमेकांवर हत्याराने वार करण्यात झाला. अनेक ठिकाणी खुनाचा प्रयत्न करण्याचा प्रकार घडले. दारूसाठी छोट्या-मोठ्या चोऱ्या करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली.
गुन्ह्याचा प्रकार जुलै २०२० अखेर जुलै २०२१ अखेर
खुनाचा प्रयत्न ४८ १७६
दरोडा ३ ११
चेन स्नॅचिंग १३ ४३
घरफोडी १५३ २१३
मोबाईल स्नॅचिंग १३ ६१
चोरी ३३७ ३८०
.............
दारूने वाढतो रागाचा पारा...
दारू पिल्यानंतर तुमचा स्वत:चा ताबा कमी होतो. त्यातून छोट्याशा घटनेवरून रागाचा पारा वाढतो. सारासार विचार करण्याची शक्यता कमी होते. त्यातून छोटे-मोठे गुन्हे होण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर दारू उपलब्ध आहे, म्हटल्यावर ती घेण्यासाठी पैसे वाटेल त्या मार्गाने मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. जे पैसे इतर वेळी घरातील संसारिक वस्तू घेण्यासाठी खर्च झाले असते, ते पैसे दारूसाठी खर्च होतात. प्रसंगी चोऱ्याही केल्या गेल्याचे आढळून येते.