पवनाथडी जत्रेचे उद्घाटन : मनोरंजन, खाद्यपदार्थांची मेजवाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 02:39 AM2018-01-05T02:39:33+5:302018-01-05T02:40:30+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावरील पवनाथडी जत्रेस आजपासून सुरुवात झाली. लोककलांचा आविष्कार आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांबरोबरच सखींचे मनोरंजनही करण्यात आले.
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावरील पवनाथडी जत्रेस आजपासून सुरुवात झाली. लोककलांचा आविष्कार आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांबरोबरच सखींचे मनोरंजनही करण्यात आले. गृहोपयोगी वस्तूंना बाजारपेठ मिळण्याबरोबरच खाद्य महोत्सवातून खवैयांना मेजवानी मिळाली. स्त्रियांचे बचत गट कर्जाची परतफेड १०० टक्के करतात. म्हणून सरकारचा त्यांच्यावर विश्वास असल्याने शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत अॅक्सिस बँकेच्या सहयोगी उपाध्यक्षा अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने गुरुवारपासून जत्रेची सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीष बापट उपस्थित होते. व्यासपीठावर महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनीता तापकीर आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाल्या, ‘‘महिलांमध्ये बुद्धिकौशल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. परंतु त्यांना योग्य संधी मिळत नाही. मात्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून दिली असून, महिलांच्या कलागुणांना व कौशल्याला वाव दिला आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात उत्तम प्रकारच्या मॅनेजर आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. गरजू महिलांना मदत करण्यातच जीवनाचे खरे सार्थक आहे. स्टार्ट अपमध्ये पुणे जिल्हा बंगलोरनंतर दुसºया क्रमांकावर आहे. महाराष्ट्रासह भारत सुपर पॉवर होणार आहे.’’
सूत्रसंचालन सहायक आयुक्त अण्णा बोदडे व संदीप साकोरे यांनी केले. आयुक्त हर्डीकर यांनी आभार मानले.
पवनाथडी जत्रा या उपक्रमामध्ये बचत गटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळावी म्हणून महापालिकेने स्टॉल उपलब्ध करून दिले आहेत. समाजाच्या विविध क्षेत्रांतील वेगवेगळे उद्योग, नवनवीन कल्पना यांचा समावेश होऊन त्याचा फायदा बचत गटांना होत आहे. राज्य सरकार आणि समाजदेखील महिलांच्या सबलीकरणास प्राधान्य देत आहे. महिलांमध्ये निसर्गत: कौशल्य असते. त्याचा फायदा या सगळ्यांच्या माध्यमातून समाजाला होत आहे.
- गिरीश बापट, पालकमंत्री