शहरात रस्ते खोदाईला ३० एप्रिलपर्यंतच मुभा

By admin | Published: April 10, 2017 03:12 AM2017-04-10T03:12:50+5:302017-04-10T03:12:50+5:30

पावसाळ्यापूर्वी एक महिना आधी शहरातील रस्त्यांची दुरूस्ती करण्यात येणार असल्याने शहरात

Opening the roads in the city till 30th April | शहरात रस्ते खोदाईला ३० एप्रिलपर्यंतच मुभा

शहरात रस्ते खोदाईला ३० एप्रिलपर्यंतच मुभा

Next

पुणे : पावसाळ्यापूर्वी एक महिना आधी शहरातील रस्त्यांची दुरूस्ती करण्यात येणार असल्याने शहरात ३० एप्रिलपर्यंतच खोदाईला मुभा देण्यात येणार आहे़ त्यानंतर पावसाळा असल्याने आॅक्टोबर २०१७ पर्यंत अत्यावश्यक कामे वगळता कोणतीही परवानगी दिली जाणार नसल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. रस्ते दुरुस्तीसाठी एक महिना लागत असल्याने ३० एप्रिलपर्यंतच परवानगी दिली जाणार आहे़
दरम्यान, शहरात सध्या चार कंपन्यांची खोदाई सुरू असून त्यात महाराष्ट्र नॅचरल गॅस, रिलायन्स इन्फ्रा, एल अँड टी आणि एमएसडीसीएस महावितरणचा समावेश आहे.
या चार कंपन्यांना मिळून ३९२ किलोमीटरच्या खोदाईस परवानगी दिली असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
शहरात वेगवेगळ्या सेवा वाहिन्यांसाठी खासगी कंपन्या तसेच शासकीय कंपन्यांकडून रस्त्यांची खोदाई केली जाते. अनेकदा ही खोदाई मुदतीत बंद न केल्याने ऐन पावसाळ्यात रस्त्यांची दुरूस्ती करता येत नाही. त्याचा फटका वाहतूकीस बसण्याबरोबरच पावसाळ्यात रस्त्यांची दुरूस्तीसही बसतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून गेल्या काही वर्षांत ३० एप्रिलपर्यंतच खोदाईस परवानगी दिली जाते. त्यानंतर आवश्यक असेल तरच तातडीची बाब म्हणून खोदाईस परवानगी दिली जाते.
(प्रतिनिधी)

दुरूस्तीसाठी एक महिना

विविध कंपन्यांकडून ही खोदाई झाल्यानंतर शहरातील रस्ते पूर्ववत करण्यासाठी जवळपास महिन्याभराचा कालावधी लागतो. सर्वसाधारणपणे ७ जूनपासून शहरात मान्सूनच्या पावसाला सुरूवात होते. त्यामुळे पावसाळ्यात डांबरी रस्त्यांची दुरूस्ती करता येत नाही.
ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाकडून मे महिन्यातच ही रस्ता दुरूस्तीची कामे पूर्ण केली जातात. त्या अनुषंगाने पथ विभागाने शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण सुरू केले असून पावसाळ्यापूर्वी शहरातील सुमारे ७५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे.
त्यात पावसाळ्यात रस्ते उखडू शकतील, केवळ त्याच भागांची दुरूस्ती केली जाणार आहे. मात्र, हे काम सुरू करण्यापूर्वी रस्त्यांची खोदाई थांबणे आवश्यक आहे़ महापालिकेकडून संबधित कंपन्यांना याची कल्पना देण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: Opening the roads in the city till 30th April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.