हेलिपॅड वापरास संरक्षण विभागाची हरकत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 03:09 AM2017-08-04T03:09:36+5:302017-08-04T03:09:36+5:30
जिल्हा प्रशासनाकडून नवीन शासकीय विश्रामगृहाच्या (व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस ) परिसरात बांधण्यात आलेल्या हेलिपॅडच्या वापरास संरक्षण विभागाने हरकत घेतली आहे.
पुणे : जिल्हा प्रशासनाकडून नवीन शासकीय विश्रामगृहाच्या (व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस ) परिसरात बांधण्यात आलेल्या हेलिपॅडच्या वापरास संरक्षण विभागाने हरकत घेतली आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही संरक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला हेलिपॅड वापरण्यात अडथळे येत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या पंचतारांकित नवीन शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात हेलिपॅडची सोय आहे. या शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या स्वतंत्र खोल्यांसह ३५ खोल्या आहेत. तसेच सभागृह व मिटिंग हॉलची सोय आहे. वेळेची बचत करण्यासाठी व वाहतुक कोंडीमुळे अनेकदा व्हीव्हीआयपी व्यक्तींना नियोजित ठिकाणी पोहचण्यात अडचणी येतात. त्यामुळे नवीन शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात हेलिपॅडची सोय करण्यात आली होती. परंतु, जवळच लष्काराचे दक्षिण मुख्यालय असल्याने संरक्षण विभागाने हेलिपॅडचा वापर करण्यास हरकत घेतली. त्यामुळे विश्रामगृह हेलिपॅड हेलिकॅप्टरच्या प्रतिक्षेत आहे.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठीच या हेलिपॅडचा वापर करणार असल्याचे हमीपत्र सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्याच प्रमाणे त्याचा व्यावसायिक वापरासाठी उपयोग केला जाणार नाही,असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेलिपॅड बांधण्यापूर्वी याबाबत संरक्षण विभागाची परवानगी घेण्यात आली होती. तसेच हेलिपॅड
बांधून झाल्यानंतर त्याच्या वापर करण्यासाठी पूर्णत्त्वाचा दाखला मिळावा याबाबत पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. बोर्डाने हा प्रस्ताव संरक्षण विभागाकडे पाठवला आहे. मात्र, सुमारे दीड ते दोन वर्षांपासून तो धूळ खात पडून आहे.