औंध येथील ट्रॅफिक पार्कचे संचलन सेफकिड्स फाउंडेशनकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:13 AM2021-08-12T04:13:37+5:302021-08-12T04:13:37+5:30
पुणे : औंध येथील ब्रेमेन चौकात उभारण्यात आलेल्या 'मुलांची वाहतूक पाठशाळा'च्या (ट्रॅफिक पार्क) संचलनासाठी, सेफकिड्स फाउंडेशनची पाच वर्षांच्या कालावधीसाठी ...
पुणे : औंध येथील ब्रेमेन चौकात उभारण्यात आलेल्या 'मुलांची वाहतूक पाठशाळा'च्या (ट्रॅफिक पार्क) संचलनासाठी, सेफकिड्स फाउंडेशनची पाच वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
'अर्बन-९५ संकल्पनेवर आधारित या ट्रॅफिक पार्कचे नुकतेच उद्घाटन केले आहे़ या प्रकल्पाच्या पहिल्या भागात १६० मीटर लांबीच्या रस्त्याची प्रतिकृती केली असून, त्यामध्ये रस्त्यावरील मार्गिका, सायकल ट्रॅक, वाहनतळ व्यवस्था, सिग्नल यंत्रणा, रोड मार्किंग, पथदिवे, पादचारी मार्ग, वाहतुक चिन्हांचे फलक यांचा समावेश आहे. तसेच या पाठशाळेत सर्वप्रकारची वाहतुक चिन्हे जमिनीवर खेळाच्या स्वरूपात उमटविण्यात आलेली आहेत. वाहतूक चिन्हांचा अर्थ सांगणारे मराठी आणि इंग्रजी भाषेतील फलक उभारण्यात आले आहेत. येथील प्रवेशासाठी मनपा आणि सरकारी शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी रुपये पाच आणि खासगी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालकांसोबत येणारे विद्यार्थी यांना प्रत्येकी २० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे़
-----
डीबीटीद्वारे क्रमिक पुस्तकांची खरेदी
पुणे महापालिकेद्वारे संचलित राजीव गांधी अॅकॅडमी आॅफ ई-लर्निंग स्कूलमधील पूर्व-प्राथमिक ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना क्रमिक पुस्तके खरेदी करता यावीत यासाठी विद्यार्थी किंवा पालकांचे आधारकार्ड संलग्न असणा-या बँक खात्यात थेट बँक हस्तांतरणद्वारे (डीबीटी) पैसे जमा करण्यात येणार आहे़ याचा लाभ 'राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमधील १ हजार ५३४ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यासाठी ४२ लाख १० हजार रुपयांची तरतूद करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
-----