पुण्यात राेबाेटिक हॅंडच्या साहाय्याने ऑपरेशन; ससून ठरले महाराष्ट्रातील पहिले रुग्णालय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 10:32 AM2023-02-08T10:32:18+5:302023-02-08T10:32:29+5:30
बावीस वर्षीय तरुणावर अवघ्या ४५ मिनिटात यशस्वी शस्त्रक्रिया
पुणे : ससून रुग्णालयात राेबाेटिक हॅंडच्या साहाय्याने एका रुग्णाची दुर्बिणीद्वारे ॲपेंडिक्सची शस्त्रक्रिया मंगळवारी करण्यात आली. सरकारीसह खासगी रुग्णालयांत अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणारे ससून रुग्णालय महाराष्ट्रात प्रथम ठरले आहे.
येरवडयातील रवी कुमार चव्हाण या २२ वर्षीय तरूणावर ही ॲपेंडिक्सची शस्त्रक्रिया ससून रुग्णालयाच्या शल्यचिकित्सा विभागाचे (सर्जरी विभाग) सहायक प्राध्यापक डाॅ. अमेय ठाकुर यांनी अवघ्या ४५ मिनिटांत ही शस्त्रक्रिया केली. एरवी यासाठी तास ते दीड तास लागताे. अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया प्रायाेगिक तत्वावर करण्यात येत असून जर त्याचे परिणाम अधिक चांगले दिसून आले तर राेबाेटिक हॅंड साधन खरेदी करून पुढील शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
वैदयकीय क्षेत्रातही आता तंत्रज्ञानाचा प्रवेश झाला असून आता राेबाेट रुग्णांवर वेगवेगळया शस्त्रक्रिया करत आहेत. मात्र, राेबाेटला चालवणारा हा सर्जन असताे. तसेच, राेबाेट खरेदीसाठी १० ते २० काेटी रूपये लागतात. तसेच त्याचा मेंटेनन्स ठेवणे, स्वतंत्र खाेली, कन्साेल रूम अशी व्यवस्था करावी लागते. एकंदरित ही खर्चिक प्रक्रिया आहे. तर राेबाेटिक हॅंडची निर्मिती करणारी ही खासगी कंपनी गुजरातमधील असून ते ससून रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करत आहेत.
काय आहे राेबाेटिक हॅंड
दरम्यान, राेबाेटिक हॅंड हे एक साॅफटवेअरचा प्राेग्राम असलेले साधन आहे. ते पिशवीमध्ये काेठेही घेउन जाता येते कारण ताे केवळ एक यांत्रिक हात असताे. ताे विजेवर चालताे. डाॅक्टरांचा हात टाके घालण्यासाठी ३६० अंशात फिरत नाही. मात्र, हे राेबाेटिक हॅंड सहजपणे करताे. त्यामुळे रुग्णाची शस्त्रक्रिया लवकर हाेते, अशी माहीती मेरिल कंपनीचे अभिजित भावसार यांनी दिली.
राेबाेटिक हॅंड शस्त्रक्रियेचे फायदे
- शस्त्रक्रिया करताना टाके टाकण्यासह विविध साधने असून ते शस्त्रक्रियेदरम्यान बदलता येतात
- यामुळे सर्जनला सहजपणे शस्त्रक्रियेस मदत हाेते, थकवा येत नाही, वेळेची बचत हाेते.
- शस्त्रक्रिेयेत अधिक अचुकता येते
''महिनाभर या राेबाेटिक हॅंड साधनाचा वापर करून शस्त्रक्रिया करण्यात येईल व त्याचे परिणाम याेग्य दिसल्यास सामाजिक उत्तरदायित्व निधीतून ते ससून रुग्णालयातील रूग्णांसाठी खरेदी करण्यात येईल. - डाॅ. संजीव ठाकुर, अधिष्ठाता, ससून रुग्णालय''