पुण्यातील शिवसृष्टीचा वाद पुन्हा उफाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 09:10 PM2018-05-11T21:10:47+5:302018-05-11T21:36:21+5:30
इतिहास अभ्यासकांमध्ये परस्परविरोधी प्रतिक्रिया उमटत असून शिवसृष्टीचा वाद पुन्हा उफाळला आहे. इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी महाराजांविषयी जे काही उभारले जाईल त्याचे स्वागत करावे अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. तर दुसरीकडे इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी मात्र प्रतिगामी भाजप सरकार प्रतिगामी लोकांनाच मदत करत असल्याची टीका केली.
पुणे :
पुणे शहरातील कात्रज परिसरात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुढाकारातून उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीला केंद्र सरकारच्या जेएनपीटी योजनेच्या अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असल्याची घोषणा गुरुवारी करण्यात आली. याबाबत इतिहास अभ्यासकांमध्ये परस्परविरोधी प्रतिक्रिया उमटत असून शिवसृष्टीचा वाद पुन्हा उफाळला आहे. इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी महाराजांविषयी जे काही उभारले जाईल त्याचे स्वागत करावे अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. तर दुसरीकडे इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी मात्र प्रतिगामी भाजप सरकार प्रतिगामी लोकांनाच मदत करत असल्याची टीका केली. दंगली घडवून सत्तेयेण्याचे संघाचे धोरण पुरंदरे यांनी आयुष्यभर पाळले आहे. त्यामुळे त्यांच्या शिवसृष्टीला मदत देणेच मुळात चुकीचे आहे असे मतही मांडले.
शिवसृष्टीबाबत सुरु असलेल्या वाद विवादावर बलकवडे यांनी लोकमतकडे प्रतिक्रिया नोंदवली असून महाराजांविषयी जे काही उभारले जाईल त्याचे स्वागत करायला हवे असे मत व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की, बाबासाहबे पुरंदरे गेली ७५व र्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा प्रसार करत आहेत. त्यांनी ग्रंथलेखन केले, जाणता राजा सारखा प्रयोग केला. शिवाजी महाराजांचे भव्य, दिव्य अद्भुत चरित्र जगासमोर यावं या दृष्टिकोनातून त्यांनी तीस वर्षांपूर्वी शिवसृष्टीनिर्माणाचा ध्यास घेतला. त्यांच्या शिवसृष्टीच्या ज्या काही कल्पना आहेत. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून महाराजांचे चरित्र यावे त्यासाठी गेले तीस वर्ष ते प्रयत्न करत आहेत. हा प्रकल्प अतिशय व्यापक आहे.त्यात चार टप्पे आहेत. जागतिक पातळीवर त्याची ओळख राहावी असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यात ३५० कोटीपैकी केंद्र सरकार या कार्याचे महत्व लक्षात घेऊन ५ कोटी रुपये देत खारीचा वाटा उचलत असेल तर त्याचे सर्व शिवप्रेमींनी स्वागत करायला हवे.पुढे ते म्हणाले की, महापालिका उभारणार असलेला प्रकल्प २० ते २५ कोटी रुपयांचा आहे. जसजशा परवानग्या येतील तसतसे त्या प्रकल्पाचे काम पुढे जाईल.त्यालाही केंद्र आणि राज्य सरकार मदत करेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे चांगल्या गोष्टीची स्पर्धा व्हायला हवी असे मत त्यांनी मांडले.
श्रीमंत कोकाटे यांनी पुरंदरे यांनी केलेली इतिहासाची मांडणी ही कायम जातीवादी, समाजवादी आणि कायम धार्मिक तेढ निर्माण करणारी होती असा आक्षेप नोंदवला.एकीकडे सरकारी शिवसृष्टी तिला अजून मान्यता नाही, त्याची जमीन निश्चित नाही आणि दुसरीकडे निधी दिला जातो याकडे त्यांनी लक्ष वेधले. यातून प्रतिगामी लोक सत्तेवर येतात तेव्हा ते प्रतिगामी लोकांनाच कशी मदत करता याचे उदाहरण पुरोगामी लोकांनी घ्यायला हवे असेही ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जातीय ध्रुवीकरण करून, दंगली घडवून सत्तेत येण्याचे धोरण पुरंदरे यांनी आयुष्यभर पाळले आहे. त्यामुळे त्यांच्या शिवसृष्टीला मदत देणेच मुळात चुकीचे आहे असे त्यांनी नमूद केले.