पुण्यात तब्बल १ कोटींचे अफिम जप्त; राजस्थानातून विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक
By नितीश गोवंडे | Published: August 2, 2023 09:04 PM2023-08-02T21:04:06+5:302023-08-02T21:04:30+5:30
पोलिसांच्या या मोठ्या कारवाईनंतर अंमली पदार्थ विकणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले
पुणे: राजस्थान येथून अफिम विक्रीसाठी आलेल्या इसमाला अंमली पदार्थ विरोधी पथक २ कडून अटक करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईनंतर अंमली पदार्थ विकणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. राहुलकुमार भुरालालजी साहु (३२, रा. चितोडगड, राजस्थान) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्या ताब्यातून १ कोटी १० लाख ३८ हजार रुपयांचे ५ किलो ५१९ ग्रॅम अफिम जप्त करण्यात आले.
अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत पोलिसांनी मागील तीन दिवसात तीन मोठ्या कारवाया केल्या असून जवळपास दीड कोटींचे अफिम जप्त केले आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने ३१ जुलै रोजी विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून राहुलकुमार साहु या अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्कराला अटक केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलिस अंमलदार मांढरे यांना माहिती मिळाली की, लोहगाव येथील पोरवाल रोड परिसरातील एसबीआय बँकेजवळील आयजीधान सोसायटीच्या गेट समोर एक व्यक्ती उभा असून त्याच्याकडे अफिम हा अंमली पदार्थ आहे. पोलिसांनी तातडीने त्याठिकाणी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अफिम जप्त करुन विमानतळ पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथक २ ने २८ जुलै रोजी फुरसुंगी येथे सापळा रचून मोहनलाल मेगाराम बिश्नोई (२४, रा. बाडनेर, राजस्थान) याला अटक करुन ६० लाख रुपये किंमतीचे ३ किले २९ ग्रॅम अफिम जप्त केले होते. ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे २ सतीश गोवेकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक एस. डी. नरके, दिगंबर चव्हाण, पोलिस अंमलदार योगेश मांढरे, शिवाजी घुले, संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, संदिप जाधव, रविंद्र रोकडे, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, संदिप शेळके, महेश साळुंखे, साहिल शेख, नितीन जगदाळे, आझीम शेख, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर यांच्या पथकाने केली.