विजयी पॅनलवर विरोधकांची दगडफेक
By admin | Published: March 15, 2016 03:59 AM2016-03-15T03:59:39+5:302016-03-15T03:59:39+5:30
साकोरी (ता. जुन्नर) येथे रविवारी (दि.१३) रात्री विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीच्या निकालावरून विजयी झालेल्या पॅनलच्या समर्थकांवर बेकायदेशीर जमाव
बेल्हा/ निमगावसावा : साकोरी (ता. जुन्नर) येथे रविवारी (दि.१३) रात्री विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीच्या निकालावरून विजयी झालेल्या पॅनलच्या समर्थकांवर बेकायदेशीर जमाव जमवून दगडफेक, काठ्यांनी मारहाण व गाड्यांचे नुकसान केल्याची घटना घडली. रात्री उशिरा या प्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत ८ जखमी झाले आहेत. सोमवारी दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत.
रविवारी विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक होती. या निवडणुकीमध्ये माजी सरपंच पांडुरंग गाडगे यांचे शिवनेर पॅनल तर उपसरपंच पांडुरंग साळवे यांचे शिवशक्ती पॅनल यांच्यात लढत झाली. मतदान झाल्यानंतर लगेचच काही वेळाने मतमोजणीही झाली. सर्व जागा पांडुरंग गाडगे यांच्या शिवनेर पॅनलने जिंकल्या. शिवनेर पॅनलचे सर्व समर्थक बाहेर जल्लोष करत असतानाच शिवशक्ती पॅनलच्या समर्थकांनी अचानक त्यांच्यावर दगडफेक तसेच काठ्यांनी मारहाण सुरू केली. अंधारामुळे दगड कोण मारत होते हे कळले नाही. या घटनेत ८ जण जखमी झाले आहेत. योगेश येवले, बाबाजी पानसरे, सुरेश विश्वासराव, ज्ञानेश्वर शिंदे, शरद विश्वासराव, प्रकाश गुंजाळ, नवनाथ साबळे, जालिंदर शिंदे हे सर्वजण जखमी झाले. यापैकी काही जखमी उपचार घेऊन घरी आले आहेत तर ज्ञानेश्वर शिंदे यांना पुणे येथे उपचारासाठी नेले असल्याचे सांगण्यात आले.
विरोधी गटाकडूनही मनोहर रभाजी विश्वासराव यांनी परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे. या नुसार शिवशक्ती पॅनलच्या नावाने मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. दमदाटी केली व दगड फेकून मारले. सोमनाथ लोंढे, संजयसाळवे, मधुसूदन ज्ञानेश्वर बनकर, फिर्यादी स्वत: मनोहर विश्वासराव, किसन विश्वासराव यांना मार लागल्याचे फिर्यादित म्हटले आहे.(वार्ताहर)
काल रात्रीच या ठिकाणी जुन्नरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई, आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी भेट दिली.
या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील हे करीत आहेत. या ठिकाणी आज पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांनी भेट दिली व परिस्थीतीचा आढावा घेतला.