Pune Porsche Car Accident: विरोधक बदनामी करतायेत; टिंगरे यांचीच का, सर्वांचीच चौकशी करा- सुनील तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 10:18 AM2024-05-30T10:18:05+5:302024-05-30T10:18:50+5:30
लोकप्रतिनिधींना मतदारसंघातील अशा अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी घटनास्थळी जावे लागते
Pune Porsche Car Accident : आमदार सुनील टिंगरे यांचीच चाैकशी का, आमची सर्वांचीच चौकशी करा, अशी उद्विग्न भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी लोकमतबरोबर बोलताना व्यक्त केली. टिंगरे पाेलिस ठाण्यात गेले ते लोकप्रतिनिधी म्हणून, त्यांनी पोलिसी कारवाईत हस्तक्षेप केला, असे कोणीही म्हटलेले नाही. विरोधक आमची बदनामी करण्यासाठी म्हणून असे आरोप करत आहेत, असेही तटकरे म्हणाले.
बिल्डर बापाच्या मुलाने मद्यप्राशन करून आलिशान पोर्शे गाडी भरधाव चालवत दोन तरुण अभियंत्यांचा बळी घेतला. हा अपघात झाल्यानंतर मध्यरात्री ३ वाजता राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरेपोलिस ठाण्यात गेले. त्यांनी तिथे राजकीय दबाव टाकला आणि एफआयआर बदलण्यास भाग पाडले, अशी टीका शहरात होत आहे. पक्षाने यावर टिंगरे यांच्याकडे काही विचारणा वगैरे केली आहे का? असे तटकरे यांना ‘लोकमत’ने विचारले.
डॉक्टर, पोलिस व राजकीय नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय; नाना पटोलेंचा आरोप
तटकरे म्हणाले की, सुनील टिंगरे यांनी पत्रकार परिषद घेतली नसती, ते तिथे का गेले हे सांगितले नसते, त्यांची भूमिका स्पष्ट केली नसती, तर पक्षाने त्यांच्याकडे विचारणा केली असती. मात्र, टिंगरे यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू स्पष्ट केली. पोलिसांनीही टिंगरे यांनी काही हस्तक्षेप केला नसल्याचे सांगितले. असे असताना विरोधक विनाकारण काहीही टीका करत आहेत. आमची बदनामी व्हावी, हाच त्याचा हेतू आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस आयुक्तांना फोन केला की नाही? याबाबत विचारणा केली आहे. त्यावर तटकरे म्हणाले, स्वत: अजित पवार यांनीच याचा खुलासा केला आहे. पालकमंत्री या नात्याने ते पोलिस आयुक्तांना फोन करून घटनेची माहिती विचारू शकतात. त्यामुळे यावर अधिक काही बोलण्याची गरजच नाही.
प्रदेशाध्यक्ष म्हणून मला टिंगरे यांचा खुलासा योग्य वाटतो. त्यामुळे त्यांना पक्षाकडून काही विचारणा करावी, असे मला वाटत नाही, असेही तटकरे यांनी सांगितले. हीच भूमिका अजित पवार यांच्या संदर्भातही आहे. विरोधक आरोप करत असतील, तर फक्त आमदार टिंगरे यांचीच कशाला, सर्वांचीच चौकशी करा, त्यातून सत्य काय ते समोर येईलच. लोकप्रतिनिधींना मतदारसंघातील अशा अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी घटनास्थळी जावे लागते. तसे केले नाही, तरी टीका होतेच व आता केले तरीही जबाबदार धरले जातेच. तिथे गेले याचा अर्थ कारवाईत हस्तक्षेप केला असे होत नाही, असे तटकरे यांनी सांगितले.