विकासकामे पाहून विरोधकांना पोटशूळ उठला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:11 AM2021-03-18T04:11:32+5:302021-03-18T04:11:32+5:30
इंदापूर: तालुक्यात कोणतीही निवडणूक आली की जातीपातीचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधक करत असतात. सामान्य शेतकऱ्यांच्या ...
इंदापूर: तालुक्यात कोणतीही निवडणूक आली की जातीपातीचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधक करत असतात. सामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी करण्यात येणाऱ्या विकासकामांसाठी आणलेला निधी विरोधकांना पाहावत नाही. त्यामुळे त्यांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. अशी टीका माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.
इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथील भीमा नदीवरील बंधाऱ्याची उंची वाढविण्याकरिता १ कोटी ७३ लक्ष निधी जलसंपदा विभागाकडून मंजूर करण्यात आला आहे. या कामाची सुरुवात बुधवारी (दि. १७) सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राज्यमंत्री भरणे बोलत होते. या वेळी राजेंद्र तांबिले, संजय पाटील, शिवाजी पाटील, विक्रम शिंदे, सतीश पांढरे, विक्रम निंबाळकर, हनुमंत कोकाटे, अतुल झगडे, संजय देवकर, सचिन सपकळ, दत्तात्रय घोगरे, सुभाष गायकवाड, सुरेश शिंदे, बाळासाहेब ढवळे, भीमा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, कार्यकारी अभियंता ध. जी. कोंडेकर उपस्थित होते.
दत्तात्रय भरणे म्हणाले की, यंदा पावसाळा लवकर सुरू होण्याची दाट शक्यता आहे. मात्र पावसाळा सुरू होण्याअगोदर संबंधित ठेकेदाराने गुणवत्तापूर्ण व दर्जेदार काम, दर्जेदार पाणी अडवण्याचे करावे. इतर विकासाच्या कामात काही चुका झाल्या तर पुन्हा ते दुरुस्त करता येतात. मात्र शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न पाणी असतो आणि हेच पाणी साठवून या कामातून होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या घरचे काम आहे असे सातत्याने लक्ष देऊन काम दर्जेदार करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
राज्यातील सरकार महाविकास आघाडीचे आहे. हे सरकार खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हिताचे काम करणारे आहे. सरकार म्हणजे नोटा छापण्याचा कारखाना नाही. आपण जे कररुपी शासनाकडे निधी जमा करतो, तोच निधी विकासकामांना वापरता येतो. यावर सरकार चालते हे लक्षात राहू द्या. त्यामुळे वीजबिल आपण भरणे गरजेचे आहे व शेतकऱ्यांची वीजदेखील अबाधित राहिली पाहिजे, हा सरकारचा उद्देश आहे, अशी माहिती राज्यमंत्री भरणे यांनी दिली.
नीरा-भीमा, कर्मयोगी कारखान्यांत खुल्या पद्धतीने सभा घ्या
इंदापूर तालुक्यातील नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना व कर्मयोगी सहकारी साखर कारखाना विरोधकांच्या ताब्यात आहे. सहकारी साखर कारखाने म्हणून मिरवतात. मात्र कोणालाही सभासद करून घेत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचा छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगरचा आहे. कोणीही तालुक्यातील शेतकऱ्यांनी सभासद होण्यासाठी अर्ज दिला की, त्या क्षणाला हा कारखाना सभासद करून घेतो. याला सहकारी साखर कारखाना म्हणतात. नीरा-भीमा व कर्मयोगी साखर कारखान्यांमध्ये खुल्या पद्धतीने सभासदांना घेऊन दाखवा, असे आवाहन राज्यमंत्री भरणे यांनी विरोधकांना केले आहे.
१७ इंदापूर भरणे भाटनिमगाव तालुका येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना दत्तात्रय भरणे.