विरोधानंतरही बाह्यवळणाचे काम
By admin | Published: October 19, 2015 01:52 AM2015-10-19T01:52:40+5:302015-10-19T01:52:40+5:30
पुणे-नाशिक महामार्गाचे राजगुरुनगरसाठीच्या दुसऱ्या टप्प्यातील बाह्यवळणाचे काम वेगाने सुरू असून पहिल्या टप्प्यातील बाह्यवळणासाठीची मोजणी मात्र अद्याप करण्यात आलेली नाही.
राजगुरुनगर : पुणे-नाशिक महामार्गाचे राजगुरुनगरसाठीच्या दुसऱ्या टप्प्यातील बाह्यवळणाचे काम वेगाने सुरू असून पहिल्या टप्प्यातील बाह्यवळणासाठीची मोजणी मात्र अद्याप करण्यात आलेली नाही.
या महामार्गावरील खेडच्या घाटाला पर्यायी बाह्यवळणाचे काम ठेकेदार कंपनीकडून जोरात सुरू आहे. हे बाह्यवळण गरजेचे नसल्याचा दावा करीत शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला होता. सध्याचा घाट रुंद करण्याला काहीही अडचण नसताना हे बाह्यवळण होत आहे, असे त्यांचे म्हणणे होते. काही धनदांडग्यानी घेतलेल्या जमिनींना रस्ता मिळावा, म्हणून हा नवीन रस्ता करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. नवीन घाटरस्ता होत असताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या हरकतींवर सुनावणी न करता आणि त्यांना नुकसानभरपाई न देताच दांडगाईने हे काम करण्यात येत असल्याचा त्यांचा आक्षेप आहे.
या रस्त्यात जमिनी जात असलेल्या शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. त्यावर सुनावणी चालू असतानाच हे काम सुरू आहे. शेतजमिनींचे पंचनामे करण्यात आले असून संपादनाच्या नोटीसीमध्ये नमूद केलेले क्षेत्र आणि प्रत्यक्षात रस्त्यात जात असलेले क्षेत्र यामध्ये तफावत आहे.
दडपशाहीने काम सुरू असल्याचा आरोप
>अधिकृत मोजणी न करताच काम सुरू केल्याचा शेतकऱ्यांचा आक्षेप आहे. रस्त्यात जाणारी झाडे, विहिरी यांच्या नोंदी केलेल्या नाहीत. दडपशाहीने काम केले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे.
>न्यायालयात नवीन रस्ता करीत असल्याचे म्हणणे न मांडता जुनाच रस्ता रुंद करीत असल्याचे अधिकारी सांगत आहेत, असाही ग्रामस्थांचा आरोप आहे.