भिंती तोडून विद्यापीठाबाहेरचे काम करण्याची संधी..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:09 AM2021-06-02T04:09:35+5:302021-06-02T04:09:35+5:30
पुणे : विद्यापीठाच्या भिंती तोडत समाजाशी नाते जोडून दुर्लक्षित घटकासाठी काम करणे ही तर विद्यापीठाबाहेरच्या समाज विद्यापीठात काम करण्याची ...
पुणे : विद्यापीठाच्या भिंती तोडत समाजाशी नाते जोडून दुर्लक्षित घटकासाठी काम करणे ही तर विद्यापीठाबाहेरच्या समाज विद्यापीठात काम करण्याची संधी आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.
रिक्षा पंचायत, जतन फाउंडेशन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘ऑक्सिजनरेटर रिक्षा’ (मिशन ओ-२) ला हिरवा झेंडा दाखवत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून सुरुवात करण्यात आली. त्यावेळी डॉ. करमळकर बोलत होते. या कार्यक्रमास ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव हे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. तर कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार, जतन फाउंडेशनचे कार्यकारी संचालक रवींद्र झेंडे, समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. श्रुती तांबे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, विद्यार्थी विकासाचे डॉ. संतोष परचुरे आदी प्रत्यक्ष उपस्थित होते.
कोरोना काळात प्रकृती गंभीर असणा-या रुग्णांना काही वेळा रुग्णालयात खाटा मिळत नाहीत, अशा रुग्णांना ऑक्सिजनरेटर या रिक्षांच्या माध्यमातून ऑक्सिजन देण्यात येणार आहे. अमेरिकेतील मॅप इंटरनॅशनल या संस्थेने प्रत्येकी पाच लिटर क्षमतेच्या ३० लाख रुपयांच्या १५ ऑक्सिजनरेटरची मदत जतन फाउंडेशनला केली आहे. रिक्षा पंचायतीच्या २५ चालकांना हे उपकरण हाताळण्याचे प्रशिक्षण इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. त्याद्वारे सुमारे १०० रुग्णांना मदत होणार आहे.
------------