युवकांना आॅस्कर ‘इंटर्न’ची संधी - डॉ. उज्ज्वल निरगुडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 03:43 AM2018-05-10T03:43:17+5:302018-05-10T03:43:17+5:30
भारतीय चित्रपट ‘आॅस्कर’साठी पाठविणे किंवा त्याला आॅस्कर मिळणे इथपर्यंतच भारतीयांच्या ‘आॅस्कर’कडे पाहण्याच्या कक्षा सीमित आहेत; पण आॅस्कर अकादमी आणि भारतीय चित्रपटांचे आदानप्रदान कसे होईल, अशा व्यापक विचारामधून या कक्षा अधिकाधिक विस्तारित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत.
- नम्रता फडणीस
पुणे : भारतीय चित्रपट ‘आॅस्कर’साठी पाठविणे किंवा त्याला आॅस्कर मिळणे इथपर्यंतच भारतीयांच्या ‘आॅस्कर’कडे पाहण्याच्या कक्षा सीमित आहेत; पण आॅस्कर अकादमी आणि भारतीय चित्रपटांचे आदानप्रदान कसे होईल, अशा व्यापक विचारामधून या कक्षा अधिकाधिक विस्तारित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आगामी वर्षात भारतीय युवकांना आॅस्कर अकादमीच्या ‘इंटर्नशीप’ उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकणार आहे.
आॅस्कर अकादमीचे सदस्य आणि ‘एसएमपीटीई’ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या भारतीय विभागाचे सदस्य उज्ज्वल निरगुडकर यांनी केलेल्या या सूचनेला अकादमीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
डॉ. उज्ज्वल निरगुडकर यांची आॅस्कर अकादमीच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर, त्यांनी प्रथमच अमेरिकेतील लॉस एंजिलिस मधल्या आॅस्कर अकादमीला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी आॅस्कर अकादमीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉन हडसन यांच्याशी तब्बल दीड तास संवाद साधून आॅस्कर आणि भारतीय चित्रपटांची नाळ कशी जोडता येईल, भारतात कोणते प्रकल्प आणणे शक्य होईल? याविषयी चर्चा केली.
यावेळी आॅस्कर अकादमीच्या ‘इंटर्नशीप’ उपक्रमामध्ये भारतीय तरुणांना सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने प्राथमिक बोलणी झाली असून, त्याला डॉन हडसन
यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अभिनय, दिग्दर्शन अशा चित्रपट क्षेत्राशी संबंधित विभागातील निवड झालेल्या तरुणांना अकादमीमध्ये तीन महिने प्रशिक्षण मिळेल. तसेच, हॉलिवूडच्या चित्रपटनिर्मिती कंपनीमध्ये सहा महिने काम करता येईल. याचबरोबर आॅस्करविजेत्या दिग्दर्शक, कलाकारमंडळींचे त्यांना मार्गदर्शन मिळेल, असे त्यांनी सांगितले.
आॅस्कर अकादमीही महत्त्वाची
जगभरातील चित्रपटांसाठी ‘आॅस्कर’ हा एक प्रतिष्ठित अवॉर्ड असतो. यंदाच्या वर्षी जर आपल्या भारतीय चित्रपटाला आॅस्कर मिळाला नाही, तर पुढच्या वर्षी तरी मिळेल याची वाट पाहायची इतकीच काय ती ‘आॅस्कर’ बद्दलची भारतीयांची धारणा आहे; पण आॅस्कर पुरस्काराव्यतिरिक्तही आॅस्कर अकादमी अनेक उपक्रम राबविते. ज्याची भारतीयांना माहितीच नाही.
त्यामध्ये स्टुडंट फिल्म फेस्टिव्हल, निकोल फिल्म राइटिंग कॉम्पिटिशन, अकॅडमी गोल्ड इंटर्नशीप प्रोग्रॅम यांचा समावेश आहे. या उपक्रमांमध्ये भारताचा सहभाग कसा वाढवता येईल, यावर चर्चा झाली. अकादमीचा ‘इंटर्नशीप’ हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आत्तापर्यंत अमेरिकेतल्या ७० तरुणांची या इंटर्नशीपसाठी ते निवड करीत होते.
या उपक्रमात भारतातील तरुणांनाही सहभागी करून घ्यावे, अशी एक सूचना मी हडसन यांना केली आणि त्याबाबत अकादमी तयार झाली आहे. पुढील वर्षापासून भारतीय तरुणांना ही संधी मिळू शकणार आहे.