ITI Admission| पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘आयटीआय’ची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 09:58 AM2022-09-08T09:58:33+5:302022-09-08T10:00:01+5:30
विद्यार्थ्यांना ७ ते ११ सप्टेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे....
पुणे : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून दहावीच्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी तसेच आतापर्यंत अर्ज सादर न केलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशप्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. राज्यात आतापर्यंत तब्बल ७० टक्के प्रवेश पूर्ण झाले आहे. तरीदेखील पुरवणी वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार विद्यार्थ्यांना ७ ते ११ सप्टेंबर या कालावधीत अर्ज भरता येणार आहे.
झटपट जाॅब देणारा अभ्यासक्रम म्हणून आयटीआयकडे पाहिले जाते. राज्यात शासकीय आणि खासगी आयटीआय मिळून प्रवेशांसाठी एक लाख ५० हजार ११६ जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी एक लाख पाच हजार ६७२ जागांवर आतापर्यंत प्रवेश झाले आहेत. राज्य मंडळाने जाहीर केलेल्या पुरवणी परीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण विद्यार्थी आणि आतापर्यंत अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी पुरवणी वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
७ ते ११ सप्टेंबरपर्यंत भरा अर्ज
विद्यार्थ्यांनी अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे, प्रवेश अर्ज शुल्क भरण्यासाठी ७ ते ११ सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. शासकीय आणि खासगी आयटीआयमधील जागा समुपदेशन फेरीद्वारे भरण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. तर, ११ सप्टेंबरला प्रवेश फेरीसाठीच्या उपलब्ध जागांचा तपशील जाहीर करण्यात येईल.
१२ सप्टेंबरला प्रवेश यादी
दरम्यान, १२ सप्टेंबरला प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे. यामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आणि नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी १३ ते १७ सप्टेंबर या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत समुपदेशन फेरीला उपस्थित राहणे आवश्यक आहे. उपस्थित विद्यार्थ्यांतून संस्थास्तरावर गुणवत्ता यादी १३ ते १७ सप्टेंबर या कालावधीत जाहीर करण्यात येईल. याच कालावधीत विद्यार्थ्यांना समुपदेशानासाठी बोलावून प्रवेशाच्या जागांचे वाटप करण्यात येणार आहे.
आयटीआय प्रवेशप्रक्रिया
शासकीय आयटीआय
उपलब्ध जागा- ९४,६२०
आयटीआयमध्ये प्रवेश- ८३,५९१
प्रवेशासाठी रिक्त जागा - ११,०२९
खासगी आयटीआय
उपलब्ध जागा - ५५,४९६
आयटीआयमध्ये प्रवेश - २२,०८१
प्रवेशासाठी रिक्त जागा- ३३,४१५
एकूण जागा - १,५०,११६
एकूण प्रवेश - १,०५,६७२
एकूण रिक्त जागा- ४४,४४४