पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात १९१ देशांचे चित्रपट पाहण्याची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 01:10 PM2019-12-10T13:10:53+5:302019-12-10T13:22:14+5:30
‘महाराष्ट्राचे हीरकमहोत्सवी वर्ष’ यंदाच्या महोत्सवात झळकणार
पुणे : यंदाच्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विविध देशांमधील १९१ चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दि. ९ ते १६ जानेवारी हा महोत्सव रंगेल. विशेष म्हणजे, ‘महाराष्ट्राचे हीरकमहोत्सवी वर्ष’ यंदाच्या महोत्सवात झळकणार असून, राज्याच्या सांस्कृतिक मूल्यांवर प्रकाश टाकणारे चित्रपट दाखविले जाणार आहेत.
महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी सोमवारी परिषदेत दिली. पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, विश्वस्त सतीश आळेकर, महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम आणि राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी प्रशिक्षण संस्थेचे (एफटीआयआय) संचालक भूपेंद्र कँथोला, चित्रपट निवड समितीचे सदस्य मकरंद साठे आणि अभिजित रणदिवे या वेळी उपस्थित होते.
डॉ. पटेल म्हणाले, ‘‘१ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. या गोष्टीला या वर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्र हे राज्य सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आणि अग्रेसर आहे. राज्यात खऱ्या अर्थाने चित्रपटसृष्टी आणि या क्षेत्रातील दादासाहेब फाळके यांसारखे प्रणेतेदेखील जन्माला आले. चित्रपटसृष्टीचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला. म्हणूनच राज्याच्या सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन यंदाच्या महोत्सवात घडविण्याचा प्रयत्न करीत आहोत.’’
याशिवाय दृश्यकलेशी निगडित विविध विषयांच्या साक्षरतेचे धडे देणाऱ्या देशातील प्रतिष्ठित अशा ‘एफटीआयआय’ संस्थेला या वर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त महोत्सवाचा उद्घाटन आणि समारोपाचा कार्यक्रम यांसह अभिनय, छायालेखन (सिनेमॅटोग्राफी) आणि ध्वनी संयोजन कार्यशाळा अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याद्वारे भारतातील चित्रपट साक्षरतेचा उत्सवच साजरा केला जाईल, ही माहिती पटेल यांनी दिली.
या वर्षी ६० देशांमधून तब्बल १,९०० चित्रपट प्राप्त झाले होते. त्यांपैकी निवडक १९१ चित्रपट पाहण्याची संधी महोत्सवात चित्रपट रसिकांना मिळेल. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, एफटीआयआय, आयनॉक्स आणि पीव्हीआर पॅव्हेलियन या चित्रपटगृहांमध्ये हे चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.
....
’पिफ’ला निधी वाढवून देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना करणार
’पिफ’ हा शासनाचा अधिकृत महोत्सव आहे. अनेक वर्षांपासून महोत्सवासाठी निधी वाढवून द्यावा, अशी मागणी केली जात आहे. यंदाच्या वर्षीही महोत्सवातील चित्रपट दाखविण्यासाठी द्यावी लागणारी रॉयल्टीची रक्कम ध्यानात घेता राज्य शासनाने अधिक निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचे हीरकमहोत्सवी वर्ष ध्यानात घेता, या निधीमध्ये भरघोस वाढ होईल, अशी आशा असल्याचे डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले.
.....
महोत्सवाची वैशिष्ट्ये
४कंट्री फोकस (देश विशेष) या विभागात ब्रिटिश कौन्सिलच्या सहकार्याने ‘युनायटेड किंग्डम’मधील चित्रपट आणि लघुपट
४ब्रिटनमधील ‘ब्रिटिश डॉक्युमेंट्री पुरस्कार’प्राप्त माहितीपट
४गीतकार मजरुह सुलतानपुरी, संगीतकार नौशाद, सतारवादक- संगीतकार पं. रविशंकर आणि जागतिक प्रसिद्धी मिळालेले इटलीचे फेडरिको फेलिनी या दिग्गजांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांचे चित्रपट पाहण्याची संधी
४सिंहावलोकन विभागात हृषीकेश मुखर्जी यांचे चित्रपट