दहावीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयात अधिकाधिक गुण मिळविण्याची " अशी " संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 06:32 PM2020-03-03T18:32:00+5:302020-03-03T18:32:20+5:30
कृतिपत्रिकेत भाषांतरासाठी दिलेले शब्द, वाक्ये, म्हणी इत्याइत्यादींचे चे भाषांतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या माध्यम भाषेत करावे.
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गेल्या काही वर्षांपासून भाषा विषयासाठी प्रश्नपत्रिकेऐवजी कृतिपत्रिका दिली जात असून विद्यार्थ्यांना कृतिपत्रिकेच्या माध्यमातून अधिकाधिक गुण मिळविण्याची संधी प्राप्त झाली आहे. मराठी भाषा विषयाची कृतिपत्रिका सोपी होती.त्यामुळे मराठी विषयात चांगले, गुण मिळतील,अशा प्रतिक्रिया मंगळवारी काही विद्यार्थ्यांनी दिल्या. येत्या 9 मार्च रोजी इंग्रजी विषयातील कृतिपत्रिकेतून विद्यार्थ्यांना अधिकाधिक गुण मिळवता येऊ शकतात. त्यादृष्टीने सर्व विद्यार्थ्यांनी तयारी केली पाहिजे.
बालभारतीच्या इंग्रजी भाषा समितीच्या सदस्या डॉ.श्रुती चौधरी म्हणाल्या, इंग्रजी माध्यमाशिवाय इतर माध्यमाच्या कृतिपत्रिकेत भाषांतरासाठी दिलेले शब्द, वाक्ये, म्हणी इत्यादिंचे भाषांतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या माध्यम भाषेत करावे. तसेच पत्रलेखन इत्यादींचे ' ब्लॉक फॉरमॅट ' मध्ये करावे. जाहिरात लेखन ही कृती परीक्षेसाठी नाही.तसेच स्क्रिप्ट रायटिंग या प्रकारची कृती किंवा प्रश्नाचा समावेश कृतीपत्रिकेत नाही,हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे.या प्रश्नांबाबत गोंधळून जाऊ नये.
भाषण लेखनाच्या कृतीमध्ये विद्यार्थ्यांनी कृतीपत्रिकेमध्ये दिलेल्या मुद्यांबरोबरच स्वत:च्या मुद्यांची भर घालावी. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर या कृतीमध्ये माहिती एका स्वरूपातून दुस-या स्वरूपात सादर करताना मुख्य मुद्दे निवडून त्यांची अपेक्षित स्वरूपात योग्य पध्दतीने रचना करावी. कारण सादरीकरणाला गुण आहेत. तसेच स्टोरी रायटिंग या कृतीमध्ये विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला ,कल्पकतेला खूप वाव आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी स्टोरी लिहावी. स्टोरीला नाव देण्यास विसरू नये,असेही श्रुती चौधरी यांनी सांगितले.