विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची संधी...!

By admin | Published: February 26, 2017 03:30 AM2017-02-26T03:30:01+5:302017-02-26T03:30:01+5:30

केंद्र सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेने खोडद येथे उभारलेल्या जगातील सर्वांत मोठ्या जीएमआरटी रेडिओ दुर्बीण प्रकल्पात या वर्षी जागतिक विज्ञान

The opportunity for students to interact with scientists ...! | विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची संधी...!

विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची संधी...!

Next

खोडद : केंद्र सरकारच्या अंतर्गत असणाऱ्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेने खोडद येथे उभारलेल्या जगातील सर्वांत मोठ्या जीएमआरटी रेडिओ दुर्बीण प्रकल्पात या वर्षी जागतिक विज्ञान दिनानिमित्त मंगळवारी व बुधवारी (२८ फेब्रुवारी व १ मार्च) विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, या विज्ञान प्रदर्शनात खगोल शास्त्रज्ञांशी थेट संपर्क साधून प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची संधी उपलब्ध करण्यात आली आहे.
एनसीआरएचे केंद्र संचालक प्रो. एस. के. घोष व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ. जे. के. सोळंकी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
जीएमआरटीच्या या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे उच्च अभ्यासक्रम व करिअरबद्दल मोठ्या प्रमाणावर माहिती मिळते. या भागातील विद्यालये, महाविद्यालये व शाळांना गणित, भौतिक, रसायन व जीव शास्त्रांतील प्रकल्प प्रदर्शित करण्यासाठी विनामूल्य व्यासपीठ जीएमआरटीकडून उपलब्ध करून दिले जाते. प्रदर्शनातील प्रकल्पांची प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अभियांत्रिकी अशा ४ गटांत विभागणी केली जाते. यातील प्रत्येक गटातील सर्वोत्कृष्ट प्रकल्पासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय आणि उत्तेजनार्थ अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत, असे विज्ञान दिन समितीचे अध्यक्ष ईश्वर चंद्रा, शास्त्रज्ञ व्ही. श्रावणी व जीएमआरटीचे प्रशासकीय अधिकारी अभिजित जोंधळे यांनी सांगितले.
या वर्षी विज्ञान प्रदर्शनात अभियांत्रिकी विद्यालयांचे १२१ प्रकल्प, शाळांचे १६ प्रकल्प आणि विविध संस्थांचे ३० प्रकल्प, असे सुमारे ३०६ विविध प्रकल्प पाहावयास मिळणार आहेत. या वर्षीच्या विज्ञान प्रदर्शनाला सुमारे २५ हजार विज्ञानप्रेमी भेट देतील, असा विश्वास अभिजित जोंधळे यांनी व्यक्त केला.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी (दि. २८ फेब्रुवारी) सकाळी ९.३० वाजता टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक प्रो. संदीप त्रिवेदी यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचा समारोप १ मार्च रोजी दुपारी ४ वाजता महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ. सुभाष साळुंके यांचे उपस्थितीत होणार आहे. या वेळी विज्ञान दिन समितीचे अध्यक्ष ईश्वर चंद्रा, जीएमआरटीचे प्रशासकीय अधिकारी अभिजित जोंधळे उपस्थित होते. (वार्ताहर)

नासाने मंगळावर सोडलेल्या यानाचे सिग्नल आतापर्यंत जीएमआरटीच्या माध्यमातून मिळविण्यात यश आले आहे, तसेच दोन आकाशगंगांमधील कृष्णविवरे इलेक्ट्रोनला गतिमान करणाऱ्या वैश्विक घटकांचा शोधदेखील जीएमआरटीच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. या दोन्ही संशोधनांची माहिती व शूटिंग या वेळी दाखविण्यात येणार आहेत. जीएमआरटीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून त्यांना मार्गदर्शन करण्यात येते. सामाजिक बांधिलकी जपण्याचा आणि विविध नवीन संदेश या प्रदर्शनात देण्यात येणार आहेत.

Web Title: The opportunity for students to interact with scientists ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.