निवडणुकीत तरुणांना संधी, सहाचे ६० करू; शरद पवार यांना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 05:15 AM2019-07-28T05:15:58+5:302019-07-28T05:20:01+5:30
'त्या सर्वांना पराभवाचा सामना करावा लागला होता.'
पुणे : विधानसभा निवडणुकीत तरुणांना अधिक संधी दिली जाणार आहे. आम्ही नव्याने तसेच ताकदीने पुन्हा पक्ष उभा करू. ६ आमदारांचे ६० आमदार आम्ही केले होते. आतादेखील त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते. सध्या आघाडीमध्ये ज्या पक्षांतरच्या घटना घडत आहेत, त्यात सत्ताधारी भाजप-शिवसेनेकडून सत्तेचा गैरवापर होत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ताधारी भाजप आणि सेनेवर टीका केली.
पवार म्हणाले, मागील काही महिन्यांत आघाडीमधील काही नेते मंडळी सत्ताधारी भाजप आणि सेनेत जाताना दिसत आहेत.
१९८० सालीही अशीच परिस्थिती झाली होती. त्यावेळी जे सत्ताधारी पक्षात गेले होते. त्या सर्वांना पराभवाचा सामना करावा लागला होता. कर्नाटकमध्ये भाजपने सत्तेचा गैरवापर करूनच सत्ता मिळविली आहे. हा सर्व प्रकार तेथील आणि देशभरातील जनतेने पाहिला आहे.
पवार म्हणाले, पक्षातून गेले त्याबद्दल काही चिंता वाटत नाही. त्यांना उत्तर कसे द्यायचे हे आम्हाला चांगले माहीत आहे. ज्यांचे तिकीट निश्चित आहे त्यांनी नाही आले तरी चालेल असे सांगितले असल्याचे सातारा व सोलापूरचे नाव घेऊन सांगितले.
तुमची ईडी आणि अन्य काही विभागामार्फत चौकशी लावू असे आघाडीतील काही नेत्यांना सांगण्यात येत असल्याचे ऐकण्यात आले आहे. अशा प्रकाराच्या दबाव तंत्रामुळे आघाडी मधील नेत्यांना भाजप आणि सेना ओढून घेत आहे. अशाप्रकारे सत्तेचा गैरवापर केल्याचे मी कधीही पाहिलेले नाही, अश्ी टीका पवार यांनी केली.
भाकड गायी गेल्याने फरक पडणार नाही - जयंत पाटील
चौकशीच्या, तुरूंगांच्या धमक्या देत भारतीय जनता पार्टी राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडीचे राजकारण करत आहे. त्याचा लाभ होणार असेल तर तो त्यांनाच लखलाभ, मात्र भाकड गायी गेल्या तर आम्हाला काही फरक पडणार नाही, आम्ही नव्या दमाच्या नेत्यांना संधी देऊन पुन्हा उभारी घेऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. भाजपचे दोन आमदार त्यांचा पक्ष सोडणार असून त्यांची नावे योग्य वेळी जाहीर करू, असे ते म्हणाले.
आयुष्यभर शरद पवार यांच्या उपकाराखाली राहायचे. आमदार, मंत्री म्हणून पदे भोगायची आणि पक्षाच्या अडचणीच्या काळात त्यांना सोडून जायचे हे योग्य नसून, जहाज बुडताना पहिल्यांदा उंदीर उड्या मारतात, बिकट कालावधीतून पक्ष उभारी घेईल अशी आशा आहे.
-आमदार हसन मुश्रीफ
प्रदेश उपाध्यक्ष, राष्टÑवादी कॉँग्रेस.