'ओल्या सुक्या' पार्टीला विरोध; मद्यधुंद पोलीस अधिकाऱ्याची नागरिकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व मारहाण; लोणी काळभोर येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 06:59 PM2021-05-18T18:59:02+5:302021-05-18T18:59:15+5:30
संबंधित पोलीस अधिकारी हे गेल्या ३ वर्षापासून लोणी काळभोर येथील एका मोठ्या गृहनिर्माण संस्थेतील सदनिकेत भाडेतत्वावर राहत आहेत.
लोणी काळभोर : पुणे पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने दारुची पार्टी करण्यास विरोध केला या कारणांवरून लोणी काळभोर येथील एका मोठ्या गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून पाचपेक्षा जास्त जणांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी ( दि.१७ ) रात्री घडला आहे.
या प्रकरणी संबधित गृहनिर्माण संस्थेमधील कोणीही रहिवाशी तक्रार देण्यास न आल्याने तक्रार दाखल झालेली नाही. विशेष बाब म्हणजे या पोलीस अधिकाऱ्याने लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या आवारात ५० पेक्षा अधिक नागरिकांना दीड तासापेक्षा जास्त वेळ अर्वाच्च भाषेत शिवीगाळ व दमदाटी केली. असे असताना या अधिकाऱ्याच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
संबंधित पोलीस अधिकारी हे गेल्या ३ वर्षापासून लोणी काळभोर येथील एका मोठ्या गृहनिर्माण संस्थेतील सदनिकेत भाडेतत्वावर राहत आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाणे हे पुणे शहर मुख्यालयाला जोडण्यात आले आहे. या पोलीस अधिकाऱ्याची बदली झाल्याने ते मंगळवारी ही सदनिका सोडुन बदलीच्या ठिकाणी राहण्यास जाणार होते. तत्पूर्वी या अधिकाऱ्याने लोणी काळभोर तसेच परिसरातील काही मान्यवर मित्रांसाठी सोमवारी रात्री घरातच पार्टीचे आयोजन केले होते.
सोमवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पार्टी सुरु होताच लॉकडाऊन असल्याचे सांगत या गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व रहिवाशांनी या अधिकाऱ्याला पार्टी करु नये अशी विनंती करण्याचा प्रयत्न केला. परंतू आपण पोलीस अधिकारी आहोत असे सांगत यास त्याने नकार दिला. तसेच त्याने ५ पेक्षा जास्त जणांना लाथा- बुक्क्यांनी बेदम मारहाण करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
हा मद्यधुंद अधिकारी ऐकत नसल्याचे लक्षात येताचज मलेल्या ५० पेक्षा जास्त रिलोणी काळभोर पोलिस ठाणे गाठले. व तेथील अधिकाऱ्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. रहिवाशी पोलिसांनी माहिती देत असतानाच तो पोलीस अधिकारीही पोलिस ठाण्यात पोहोचला. परत तिथे या अधिकाऱ्याने रहिवाशांना शिवीगाळ व दमबाजी करण्यास सुरुवात केली. यावर पोलिस ठाण्यात उपस्थित असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू त्याने शिवीगाळ करणे सुरुच ठेवले. यावेळी रहिवाशी तक्रार देण्यावर ठाम असल्याचे लक्षात येताच त्याने हद्दीतील एका स्वयंघोषीत दादाला पोलिस बोलावुन घेतले. तो येताच, लोणी काळभोर पोलिसांनी रहिवाशांना कारवाई करतो असे सांगून घरी पाठवले. परंतू मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत या मद्यपी अधिकाऱ्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल झालेली नव्हती.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी म्हणाले, पार्टी करण्यास विरोध केल्याच्या कारणावरुन मद्यपी पोलीस अधिकाऱ्याकडुन रहिवाशा्ंना बेदम मारहाण व शिवीगाळ, गोंधळ घातल्याचा प्रकार खरा आहे. मात्र संबधित गृहनिर्माण संस्थेमधील रहिवाशी तक्रार देण्यास पुढे न आल्याने तक्रार दाखल झालेली नाही. परंतू, हे नागरीक तक्रार देण्यास तयार असतील तर पोलीस तक्रार दाखल करुन घेण्यास तयार आहेत.