मार्केट यार्डातील पे ॲन्ड पार्कला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:11 AM2021-05-25T04:11:02+5:302021-05-25T04:11:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोनासारख्या महामारीचे संकट असताना पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने गुलटेकडी मार्केट यार्डातील फळे, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनासारख्या महामारीचे संकट असताना पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने गुलटेकडी मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला बाजारात नव्याने सुरू करण्यात आलेल्या पे ॲन्ड पार्क धोरणाला सर्वच बाजार घटकांनी विरोध केला आहे. प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास संबंधित बाजार घटक संघटनांकडून काम बंद आंदोलनाचा इशारा अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीने दिला आहे.
बाजार समितीने पहिल्यांदाच मार्केट यार्ड आवारात पे अॅन्ड पार्क सुरू केले असून, त्यासाठी ६ कोटींची निविदा केवळ १ कोटी ३३ लाखांत स्पर्धा न करता एका ठेकेदाराला दिली आहे. संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ आदेश दिला असून, त्यानुसार मंगळवार (दि.२५) पार्किंग शुल्क वसुली केली जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी न करण्याची मागणी अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीने दिला आहे. या समितीत हमाल पंचायत, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियन, टेम्पो पंचायत, तोलणार संघटना, महाराष्ट्र टेम्पो संघटना आदींचा समावेश आहे. टेम्पो पंचायतचे अध्यक्ष संतोष नांगरे यांनी याबाबत बाजार समितीला निवेदन दिले आहे.
पार्किंग शुल्कापोटी रोज १०० ते २०० रुपये दिल्यानंतर, टेम्पो चालकांना भाडे परवडणार नाही. त्यामुळे साहजिकच टेम्पो चालकांना भाडेवाढ करावी लागेल. त्यामुळे महागाई वाढणार असून, त्याचा परिणाम हा ग्राहकांपासून सर्व संबंधित घटकांवर होऊन बाजार कोलमडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सद्य:स्थितीचा विचार करून पार्किंग शुल्क आकारण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करू नये, अन्यथा आम्हाला नाइलाजस्तव सर्व बाजारातील संबंधित घटकांना काम बंद आंदोलन करावे लागेल, असा इशाराही निवेदनाव्दारे दिला आहे.
------
बाहेरगावच्या वाहनांना वेगळा न्याय का ?
मंगळवारपासून बाजारातील ३ व ४ चाकी वाहनांकरिता पार्किंग शुल्क आकारले जाणार आहे. मात्र, यात बाहेरगावच्या खरेदीदारांना सुट देण्यात येणार आहे. मग, पुणे आणि बाहेरगावच्या वाहनांसाठी वेगवेगळा न्याय का, असा सवालही संघटनांनी केला आहे.
-----