भाडेआकारणीला विरोध; पथारी व्यावसायिकांचा पुणे महापालिकेवर धडक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 01:27 PM2018-01-18T13:27:11+5:302018-01-18T13:31:37+5:30
पथारी व्यावसायीक कष्टकरी पंचायतीच्यावतीने पुणे महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शहरामधून हजारो कष्टकरी सहभागी झाले होते.
पुणे : महापालिकेने शहरातील पथारी व्यावसायिकांची अ, ब, क आणि ड अशी वर्गवारी करुन त्यांना नुकतेच परवाने दिले आहेत. या पथारी व्यावसायिकांना दिवसाला, २००, १५०, १०० आणि ५० रुपये अशी भाडे आकारणी केली जात आहे. पालिकेचा हा निर्णय म्हणजे कष्टकऱ्यांची पिळवणूक असून हा जिझीया कर असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी केली आहे. हे भुईभाडे तत्काळ रद्द करावी, अशी मागणी हजारो पथारी व्यावसायिकांनी केली.
पथारी व्यावसायीक कष्टकरी पंचायतीच्यावतीने पुणे महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शहरामधून हजारो कष्टकरी सहभागी झाले होते. स्टॉलधारक, फिरते विक्रेते, हातगाडी चालकांनी या मोर्चामध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदवत प्रशासनाच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला. स्वारगेट येथील केशवराज जेधे चौकामधून सकाळी अकराच्या सुमारास मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मोर्चाचे नेतृत्व स्वत: डॉ. बाबा आढाव आणि पंचायतीचे सचिव बाळासाहेब मोरे यांनी केले.
बाजीराव रस्त्याने हा मोर्चा पुणे महापालिकेवर पोचला. मोर्चादरम्यान पथारी व्यावसायीकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पालिकेचे अधिकारी कसे पैसे उकळतात, भ्रष्टाचार कसा केला जातो, कष्टकऱ्यांना नाडण्याचे काम हे अधिकारी करतात अशा स्वरुपाच्या घोषणा देण्यात येत होत्या. हातामध्ये लाल झेंडे घेऊन मोठ्या प्रमाणावर महिलाही सहभागी झाल्या होत्या. पथारी व्यावसायीकांचे दिवसाचे उत्पन्न अत्यल्प आहे. या उत्पन्नामधून दिवसाला होणारी भाड्याची आकारणी कष्टकऱ्यांना न पेलवणारी आहे. शहरामध्ये एकीकडे धनदांडग्यांची आणि बड्या व्यावसायीकांची अतिक्रमणे वाढत चाललेली असताना त्यावर कारवाई करण्यास प्रशासन धजावत नाही. मात्र, दुसरीकडे गरीब कष्टकऱ्यांच्या कष्टाची भाकर हिरावून घेण्याचा प्रयत्न महापालिकेचे अधिकारी करीत असल्याचा आरोप बाळासाहेब मोरे यांनी केला.