जेजुरी घाटरस्त्याला विरोध, गडाच्या अस्तित्वाला पोहोचू शक तो धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:53 AM2018-07-09T00:53:46+5:302018-07-09T00:53:57+5:30
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणा-या श्री मार्तंड देवसंस्थानने गडावरील घाटरस्त्याच्या कामासाठी जाहीर निविदा मागविल्यामुळे जेजुरीकरांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. रस्त्याच्या कामाचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांची तातडीची बैठक घेण्यात आली.
जेजुरी - महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणा-या श्री मार्तंड देवसंस्थानने गडावरील घाटरस्त्याच्या कामासाठी जाहीर निविदा मागविल्यामुळे जेजुरीकरांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. रस्त्याच्या कामाचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांची तातडीची बैठक घेण्यात आली.
मंदिर गडकोट परिसर वाचविण्यासाठी नागरिकांनी सामंजस्याची भूमिका घेतली आहे. मात्र, विश्वस्त मंडळाने गडावर रस्ता करण्याचा निर्णय घेतल्याने गडाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. जेजुरगड मंदिर आणि गड परिसर वाचविण्यासाठी लढा देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी या बैठकीत केला.
या रस्त्याला विरोध करण्यसाठी माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, माजी विश्वस्त सुनील असवलीकर, संजय इनामके, गणेश टाक, जेजुरी शहर नागरिक हक्क कृती समिती अध्यक्ष राहुल मांगवाणी, भाजप शहराध्यक्ष अशोक खोमणे, बापू वीरकर, अविनाश झगडे, संदीप केंजळे, छबन कुदळे, प्रसाद अत्रे, अतुल सावंत व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
२००१ मध्ये हा रस्ता करण्याचा प्रथम प्रयत्न करण्यात आला होता. जेजुरीकर ग्रामस्थांचा विरोध, संपूर्ण महाराष्ट्रातील पर्यावरणवादी संस्था व पुरातत्त्व विभागामुळे या रस्त्याचे काम बंद करण्यात आले होते.
जेजुरगड टेकडीवर असून मुरुमाड दगड व गेरूस्तर असलेली ही टेकडी आहे. मागील रस्त्याच्या प्रयत्नांतून हे स्तर उघडे पडले असून, टेकडीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. त्यामुळे दरड कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत. या टेकडीवर असलेल्या मंदिराच्या गडकोटास पाया नसून कोटाच्या तळातील दगड ठिसूळ झाल्याने सभोवती सिमेंट काँक्रीटचे संरक्षण उभे करून आधार देण्यात आला आहे.
सुमारे पाचशे वर्षांपूर्वी या गडाचे काम झाले असून, तीनशे वर्षांपूर्वी गडाचे पुनर्निर्माण झालेले आहे. रस्त्याचे बांधकाम व रस्त्यामुळे मानवी हस्तक्षेप वाढल्याने टेकडीस इजा पोहोचू शकते व गडाचे अस्तित्वही धोक्यात येऊ शकते.
श्री मार्तंड देवसंस्थानने रस्ता निर्माण करण्यासाठी आपत्कालीन रस्ता असे गोंडस नावाखाली घाटरस्त्याचे काम सुरू करण्याचा प्रयत्न चालवला आहे.
मार्च २०१८ मध्ये विश्वस्त मंडळाने कुठलाही ठराव न करता तसेच जेजुरीकरांना विश्वासात न घेता घाटरस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु केले.
त्यासाठी गडाच्या टेकडीवर विनापरवानगी गौण खनिजाचे उत्खनन केले. याविरोधात हेमंत सोनवणे यांनी तक्रार केली होती. दिनांक ९ एप्रिल २०१८ रोजी पुरातत्त्व खात्याच्या पुणे विभागाकडून श्रीमार्तंड देवसंस्थान यांना पत्राद्वारे सूचित करण्यात आले होते की जेजुरगड मंदिर व परिसर पुरातत्त्व विभागाने संरक्षित वास्तू म्हणून अधिसूचित केले असून, येथे या परिसरामध्ये कुठलेही बदल करण्यापूर्वी पुरातत्त्व खात्याला कळविणे बंधनकारक आहे आणि ना हरकत असल्याशिवाय कुठलेही काम करू नये.
असे असतानाही हे काम होत आहे. मंदिर गडकोट परिसर वाचविण्यासाठी जेजुरीकर नागरिकांनी आत्तापर्यंत सामंजस्याची भूमिका घेतली आहे. जेजुरगड मंदिर आणि परिसर वाचविण्यासाठी जेजुरीकर नागरिकांचा लढा देण्याचा निर्धार आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी दि. १५ रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आल्याचे माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी सांगितले.
जेजुरी श्रीमार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी जेजुरीगडावर आपत्कालीन रस्ता करण्याचे निर्देश धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले होते. त्यानुसार रस्त्याचे टेंडर काढण्यात आले आहे. या रस्त्याला ग्रामस्थांचा विरोध असेल तर ग्रामस्थांशी चर्चा करून मार्ग काढू. शहराच्या हितासाठीचा निर्णय घेण्यात येईल, असे म्हटले आहे.