‘नटराज’ ने मागितलेल्या त्या जागेला विरोधच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:09 AM2021-06-04T04:09:27+5:302021-06-04T04:09:27+5:30
बारामती: शहरातील नटराज नाट्य कला मंडळाच्या कार्याध्यक्षांनी साध्या अर्जाद्वारे शहरातील मोक्याच्या जागेची मागणी केली आहे. सिटी सर्व्हे क्रमांक ...
बारामती: शहरातील नटराज नाट्य कला मंडळाच्या कार्याध्यक्षांनी साध्या अर्जाद्वारे शहरातील मोक्याच्या जागेची मागणी केली आहे. सिटी सर्व्हे क्रमांक ९०८ ते ९१४ मधील सुमारे ३४ गुंठे जागा पालिकेकडे नाममात्र दरात मागितली आहे. या मागणीला आमचा विरोध आहे. आमच्या विरोधानंतर देखील निर्णय घेतल्यास त्यासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा विरोधी पक्षनेते सुनील सस्ते आणि नगरसेवक विष्णुपंत चौधर यांनी दिला आहे.
नगरपालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. याबाबत सस्ते यांच्यासह चौधर यांनी पत्रकारांशी बोलताना आक्षेप नोंदविले. त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, नगरपालिका हद्दीतील वॉर्ड नं. ३ मधील सिनेमा रस्त्यालगतच्या २६ मिळकती ९९ वर्षाच्या भाडेपट्ट्याने देण्यात आल्या आहेत. त्याची मुदत येत्या ऑगस्टमध्ये पूर्ण होत आहे. तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कार्यकाळात १९९९ मध्ये याबाबत पूर्वीच निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्या जागेपोटी रेडीरेकनरच्या ५० टक्के रक्कम भरून ती मालमत्ता संबंधिताच्या नावे करून देण्याचा शासकीय निर्णय आहे. परंतु तसे न करता प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करत वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप सस्ते यांनी केला. मुळात जी जागा पालिकेची आहे, ती भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतरित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पालिका कशासाठी प्रस्ताव दाखल करते आहे, असा सवाल सस्ते यांनी केला.
नगरपरिषद सभेत १८ व्या विषयानंतर पुढील विषय चर्चेसाठी घेतले नाहीत. यामध्ये १९ ते २९ विषय चर्चेसाठी घेतले नसल्याचा आरोेप सस्ते यांनी केला आहे. या वेळी सभा गुंडाळल्याचा दावा सस्ते यांनी केला आहे. तर, रुई भागात स्थानिक नागरिक, वतनदारांना पाणी नाही. अनेक वेळा स्थानिकांना दोन दोन दिवस पाणी मिळत नाही. मात्र, काही नवीन बिल्डरला दीड किमी पाणी देण्याचे नियोजन केले जात असल्याचा आरोप चौधर यांनी यावेळी केला.
शहरात एकीकडे काही लसीकरण केंद्रासाठी सगळी सरकारी यंत्रणा राबते. दुसरीकडे कोणी अशी केंद्रे सुरू केली तर त्यासाठी कोणतेही मनुष्यबळ पुरवले जात नाही.मग बारामती कोरोनामुक्त कशी होणार, असा सवाल देखील सस्ते यांनी केला आहे.
पालिका विविध कामे आऊटसोर्सिंगद्वारे करते. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जीवन प्राधिकरण, महावितरणकडे कोट्यवधींची रक्कम दिली जाते. ठेव तत्त्वावर ही कामे करताना पालिकेचे पैसे या विभागांकडे पडून राहत असल्याचे सस्ते म्हणाले.