बालभारती -पौड रोड विरोधामुळे कर्वे रोडवासियांचा जीव गुदमरतोय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 12:48 PM2018-12-12T12:48:18+5:302018-12-12T13:00:26+5:30
मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या या भागातील वाहतूक कोंडीमुळे या रस्त्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे़.
पुणे : मेट्रोच्या कामासाठी कर्वे रोडवरील वाहतूक वळविण्याचा प्रयोग प्रचंड वाहतूक कोंडीमुळे दोनदा रद्द करावा लागल्याची वेळ आली आहे़. सुमारे १५ वर्षांपासून बालभारती -पौड रोड दरम्यानच्या रस्त्याला पर्यावरणवादी आणि लॉ कॉलेजने केलेल्या विरोधामुळे हा रोड अजूनही कागदावर राहिला आहे़ लॉ कॉलेज आणि कर्वे रोडला पर्यायी ठरू शकणारा हा रोड न झाल्याने आता वाहनांच्या प्रदुषणामुळे कर्वे रोड आणि लॉ कॉलेज रोडवर राहणाऱ्या लोकांचा जीव गुदमरुन जाऊ लागला आहे़. मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या या भागातील वाहतूक कोंडीमुळे या रस्त्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे़. बालभारती ते पौड फाटा दरम्यानच्या रोडबाबत उच्च न्यायालयाने बालभारती ते पौडफाटा दरम्यानच्या रोडमुळे होणाऱ्या पर्यावरण आघात मुल्यमापनाचा (एन्हायर्नमेंटल इम्पॅक्ट अॅसेसमेंट - ईआयए) अहवाल सादर करावा. हा अहवाल पाहून त्यानुसार पुढील निर्णय घेऊन असा आदेश २०१६ मध्ये दिला होता़. महापालिकेने केवळ डीपीमध्ये या रस्त्याचा समावेश केला़. पण गेल्या २ वर्षात यावर महापालिकेने काहीही कारवाई न केल्याने या रस्त्याचे भिजत घोंगडे पडून आहे़. माजी नगरसेवक निलेश निकम म्हणाले , कर्वे रोड, लॉ कॉलेज रोडवर होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेऊन हा रस्ता प्रस्तावित केला होता़ परंतु, सुरुवातीपासून न्यायालयीन व पर्यावरणप्रेमींचा अडथळा आला़. शाम सातपुते, शिवा मंत्री यांनीही आपल्याबरोबरीने प्रयत्न केले़. भांडारकर इन्स्टिट्युटने त्यांची जागा महापालिकेच्या ताब्यात दिली़. २००० साली २४ कोटी रुपयांचे टेंडर काढून कामही सुरु करण्यात आले होते़. त्याला लॉ कॉलेजने आक्षेप घेऊन स्थगिती मिळविली़. आम्ही लॉ कॉलेजला शासनाने दिलेली सनद मिळविली़. त्यात शासनाला सार्वजनिक कामासाठी जागा हवी असेल, तेव्हा ती जागा द्यावी असे म्हटले होते़. ही सनद जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी रितसर जागा ताब्यात घेतली़. त्यानंतर काही सामाजिक संस्था व लॉ कॉलेजने या रस्त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याचे सांगत उच्च न्यायालयात धाव घेतली़. या रस्त्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होईल़. रस्त्याबरोबर अन्य उद्योग, व्यवसाय येतील़ त्यातून प्रदुषण व पर्यावरणाची हानी होईल़. या रस्त्यामुळे पर्यावरणाची किती हानी होणार व या रस्त्यावरुन किती वाहने जाणार याचा काहीही सर्व्हे करण्यात आला नसल्याचा आक्षेप घेण्यात आला होता़. त्यामुळे उच्च न्यायालयाने या रस्त्याच्या कामाला स्थगिती दिली़. दरम्यान, शहरातील वाहनांची संख्या वाढत असल्याने व कर्वे रोड, कोथरुडकडे जाण्यासाठी पर्याय नसल्याने उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांचा सर्व ओघ सेनापती बापट रोडमार्गे लॉ कॉलेज रोडला येऊ लागला़. त्यातून या परिसरात सकाळ, सायंकाळ वाहतूक कोंडी ही नित्याचा भाग बनली आहे़. दरम्यान, महापालिकेच्या विकास आराखड्यात या रस्त्याचा समावेश होऊ नये, यासाठी पर्यावरणप्रेमींचा प्रयत्न होता़. पण तो न जुमानता डीपीमध्ये या रस्त्याचा समावेश करण्यात आला़. जवळपास १० वर्षानंतर २०१६ मध्ये उच्च न्यायालयाने पर्यावरण आघात मुल्यमापनाचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे़. याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे नागरिक चेतना मंचचे जनरल एस सी एन जठार यांनी सांगितले की, आमचा रस्त्याला विरोध नाही़ पण महापालिकेने कोणतीही शास्त्रोक्त पाहणी न करता, सर्व्हे न करता या रस्त्याचे काम सुरु केले होते़ या रस्त्यामुळे पर्यावरणाची किती हानी होईल, ही हानी कशी भरुन काढणार, या रस्त्यावरुन किती वाहने जातील, याचा काहीही अभ्यास केला नाही़ त्यामुळे पुणेकरांचे पैसे अनाठायी खर्च होऊन दुसरीकडे पर्यावरण ऱ्हास होणार असल्याने आम्ही न्यायालयात धाव घेतली होती़. महापालिकेने अशा प्रकारे शहरात अभ्यास न करता अनेक पादचारी उड्डाण पुल बांधले आहेत़. ससून रुग्णालयाजवळचा पादचारी उड्डाणपुल असाच वापरात नसल्याने शेवटी पाडावा लागला़. महापालिकेने संपूर्ण अभ्यास करुन सर्व्हे करुन त्याच्या हानी, नुकसान, फायदाचा लेखाजोखा मांडून मगच काम करावे, असे आमचे म्हणणे असल्याचे जठार यांनी सांगितले़. त्यादृष्टीने आता महापालिकेने सर्व्हे करण्यासाठी नुकतेच टेंडर काढण्यात आले आहे़.
.....
कर्वे रोड, लॉ कॉलेज रोडला पर्याय म्हणून २५ वर्षांंपासून या रस्त्याचा प्रस्ताव आहे़. तो जर झाला असता तर आज लॉ कॉलेज रोड, कर्वे रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न इतका जटील झाला नसता व त्यामुळे या भागात होणारे ध्वनी व वायुच्या प्रदुषणाला येथील लोकांना सामना करावा लागला नसता़ - निलेश निकम, माजी नगरसेवक़
....................
लॉ कॉलेज रोड ला होता पर्यायबाल भारती ते पौड रोड या रस्त्याचा प्रस्ताव १९९४ पासून होता़. शहरातील वाढती वाहनांची संख्या व कोथरुड, पौड रोडवरील वाढणारी नागरिकीकरण लक्षात घेऊन लॉ कॉलेज रोडला पर्याय म्हणून हा रस्ता सूचविण्यात आला होता़. पण त्याला न्यायालयीन लढ्यामध्येच तो अडकून पडला आहे़. हा रस्ता झाल्याने पर्यावरणाची जी हानी झाली असती़. त्यापेक्षा अधिक प्रदुषण गेल्या दहा वर्षात नळस्टॉप व लॉ कॉलेजवर वाहनांमुळे झाले आहे़.
.............................
हा रस्ता झाला असता तर आज लॉ कॉलेजवरुन जाणारी व येणारी ७० टक्के वाहने या रस्त्यावरुन गेली असती़. नळस्टॉप चौकात गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडी होते आहे़. ती मोठ्या प्रमाणावर टाळली असती़. तसेच या रस्त्यावर चार चार सिग्नल व त्यामुळे वाया जाणारे मनुष्य तास याचा विचार करता या रस्त्यामुळे होणाऱ्या हानी पेक्षा अधिक हानी गेल्या १० - १५ वर्षात येथे झाली आहे़. या रस्त्याला विरोध करुन कर्वे रोडवरील प्रदुषणात वाढ झाल्याने तेथील लोकांना चांगले जीवन जगण्याच्या हक्कापासून वंचित केले जात आहे, असे या रस्त्याच्या समर्थकांचे म्हणणे आहे़.