मराठी साहित्यात फादर दिब्रिटो यांचे काम शून्य ; अध्यक्षपदाला ब्राह्मण महासंघाचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 05:01 PM2019-09-24T17:01:11+5:302019-09-24T17:05:12+5:30
उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संभेलनासाठी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीला आता विरोध होऊ लागला आहे.
पुणे : फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं साहित्य ख्रिस्ती धर्मावर आधारित आहे. मराठी साहित्यात दिब्रिटो त्यांचे काम शून्य आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली त्यांची निवड थांबवावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनेचे आनंद दवे यांनी केली आहे.
उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संभेलनासाठी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीला आता विरोध होऊ लागला आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं साहित्य ख्रिस्ती धर्मावर आधारित असून मराठी साहित्यात दिब्रिटो त्यांचे काम नाही असा आरोप करण्यात येत असून अध्यक्षपदी झालेली त्यांची निवड थांबवावी अशी मागणी काही हिंदुत्ववादी संघटनांतर्फे करण्यात येत आहे.
याबाबत दवे म्हणाले की, 'मराठी साहित्याची सेवा करणाऱ्या, मराठी साहित्याचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणाऱ्या साहित्यिकांमधून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड केली जाते. फादर दिब्रेटो यांचे आजवरचे लेखन पाहिले असता मराठी साहित्यातील कोणता विचार त्यांनी इतरांपर्यंत पोहोचवला, असा प्रश्न निर्माण होतो. त्यांची आजवरची सर्व पुस्तकं ही ख्रिस्ती धर्मावर आधारित आणि ख्रिस्ती धर्म हा इतर धर्मापेक्षा कसा चांगला आहे, यावरच आधारित आहेत. ज्याप्रमाणे मदर तेरेसा यांचे काम ख्रिस्ती धर्म वाढीसाठी होतं तसेच दिब्रिटो यांचं लेखनही ख्रिस्ती धर्मासाठी आहे.
पुढे ते म्हणाले की, दिब्रिटो यांच्याकडे थोडी जरी नैतिकता असेल तर त्यांनी स्वतःहून हे पद स्वीकारू नये. महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन तातडीने त्यांची निवड थांबवावी अशी मागणी आहे. मराठी साहित्यात अनेक मोठे साहित्यिक असताना दिब्रिटो यांच्यासारख्या धर्मांध व्यक्तीला असे साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देणे चुकीचे आहे अशा शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली.