चाकण हद्दवाढीला विरोध
By Admin | Published: January 30, 2016 03:57 AM2016-01-30T03:57:42+5:302016-01-30T03:57:42+5:30
चाकण नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नगर परिषदेच्या हद्दवाढीचा विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आला. याबाबत, या हद्दवाढीत समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित
आंबेठाण : चाकण नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत नगर परिषदेच्या हद्दवाढीचा विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आला. याबाबत, या हद्दवाढीत समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित असणाऱ्या गावांमधून चाकण नगर परिषदेच्या या निर्णयाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. नगर परिषद हद्दीत जायचे की नाही, याबाबत आमचा निर्णय आम्हाला घेऊ द्या, असा सूर उमटत आहे. त्यामुळे हद्दवाढीचा निर्णय म्हणजे, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, असाच झाला आहे.
चाकण शहराला सेवा पुरविण्याचे सोडून, नगर परिषद अजून गावे समाविष्ट करून काय साध्य करणार आहे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नगर परिषदेने आधी शहराचे प्रलंबित प्रश्न सोडवावे; मगच आमच्या समावेशाचा विचार करावा, असा स्पष्ट इशारा या गावांनी दिला आहे.चाकण नगर परिषदेच्या प्रस्तावित हद्दवाढीमध्ये मेदनकरवाडी, कडाचीवाडी, नाणेकरवाडी, खराबवाडी, कुरुळी, चिंबळी, मोई, निघोजे, महाळुंगे, खालुंब्रे, आंबेठाण, बिरदवडी, गोनवडी, पिंपरी खुर्द, रोहकल, वाकी खुर्द या गावांचा समावेश करावा, असा ठराव चाकण नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला; परंतु या गावांमध्ये नगर परिषदेच्या या निर्णयाविरोधात संतापाची तीव्र लाट असून, याविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा या गावांच्या लोकप्रतिनिधींनी दिला आहे. त्यासाठी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत याला विरोध करून तसे ठरावदेखील करण्यात आले आहे. आमच्या ग्रामपंचायती या गावांना सेवा पुरविण्यात सक्षम आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने गावात रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता; तसेच आरोग्याच्या सुविधा चांगल्या प्रमाणात देण्यात येतात. गावात स्थानिक पातळीवर समन्वय आणि एकोप्याचे वातावरण आहे. तसेच आतापर्यंत या गावांपैकी अनेक ग्रामपंचायतींनी निवडणुका बिनविरोध केल्या आहेत. रोहकल, गोनवडी, पिंपरी खुर्द यांसारख्या गावात तर ९९ टक्के लोक हे शेती करतात. या गावांमधील रोजगाराची अकृषक टक्केवारी फक्त १ टक्का आहे. अशा विविध कारणांमुळे नगर परिषदेच्या प्रस्तावित हद्द वाढीत समावेश करू नये, अशा प्रकारचे ठराव या ग्रामपंचायतींनी केले आहेत.
प्रस्तावित हद्दवाढ ही १५ ते १६ किलोमीटर असून, या प्रस्तावात सुचविलेल्या काही गावांमध्ये अजिबात शहरीकरण झालेले नाही. ही गावे समाविष्ट करावी म्हणून या गावांमधील कोणत्याही लोकप्रतिनिधींनी अशी मागणी केलेली नाही, त्यामुळे जनतेची मागणी नसेल तर नगर परिषद या गावांच्या समावेशास उत्साही आणि आग्रही का आहे, असा सवाल पुढे येत असून, या समावेशास आमचा तीव्र विरोध असल्याची स्पष्ट भूमिका या गावातील लोकप्रतिनिधींनी घेतली आहे.
आजूबाजूंच्या गावांना विश्वासात घेऊन हद्दवादीचा विचार करावा. येथे नुकतीच नगर परिषद सुरू झाली आहे. आधी कारभार सुरळीत करावा; मगच हद्दवाढीचा विचार करावा. हे तर असे झाले की, मुलगा जन्माला येण्याआधीच लग्नाचा विचार सुरू.
- दिलीप मोहिते पाटील,
माजी आमदार
या ठरावला आमचा तीव्र विरोध आहे. आमच्या उत्पनावर यांचा डोळा आहे. आम्ही आर्थिकदृष्टीने सक्षम आहोत. सर्वसामान्य नागरिकांना नगर परिषद आल्याने मोठी अडचण होईल. तसेच, आमचे गाव आम्ही स्मार्ट व्हिलेज बनविणार आहोत. यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू.
- प्रियांका मेदनकर
सरपंच-मेदनकरवाडी
संबंधित ग्रामपंचायतींची संमती घेऊन गावे समाविष्ट करावी. सुरुवातीला लगतची गावे घ्यावी आणि मग त्यांचा अनुभव घेऊन पुढे विचार करावा. १३ ते १४ किमी परिसरातील गावे एकाच वेळी समाविष्ट करणे चुकीचे आहे. बाजूची अनेक गावे शेतीप्रधान आहेत.
- शरद बुट्टे-पाटील,
माजी सभापती, जि.प.
अजून आमचे कामही सुरळीत सुरू नाही. निवडणूक होऊन दोनच महिने झाले आहेत. ज्या वाड्या-वस्त्यांचा समावेश करायचा आहे, त्यांना विश्वासात घेऊन समावेशाचा विचार केला पाहिजे.
- जीवन सोनवणे, विरोधीपक्ष नेते चाकण नगर परिषद
भारतीय जनता पार्टी या ठरावाच्या विरोधात आहे. महाळुंगे गाव हे तीर्थक्षेत्र असल्याने या गावाचा समावेश करू नये, यासाठी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री महोदयांना भेटणार आहे.
- दिलीप वाळके,
भाजपा तालुकाध्यक्ष
या ठरावास आमचाही तीव्र विरोध आहे. याविरोधात वेळप्रसंगी रस्त्यावरही उतरण्यास आम्ही कमी करणार नाही़
- मनोज बोत्रे
उपसरपंच, खालुंब्रे