काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:10 AM2021-01-02T04:10:19+5:302021-01-02T04:10:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या विषयात काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का?” असा प्रश्न ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या विषयात काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का?” असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. शनिवारी (दि. १) ते पत्रकारांशी बोलत होते. संभाजी महाराजांच्या नावालाच विरोध असेल तर मात्र औरंगजेबाचे नाव पहिल्यांदा हटवा, अशीही मागणी त्यांनी केली.
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करणे हा मुद्दा राजकीय नाही तसेच निवडणुकीचा देखील नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “हा भावनिक मुद्दा आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा ही मागणी सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. तुम्ही नामांतराच्या गोधड्या वाळवत आहात असे आम्हाला म्हणत होता, तर मग आता करा नामांतर. काँग्रेसचा विरोध आहे, अन् शिवसेनेला नामांतर पाहिजे आहे. यात आम्हाला पडायचे नाही,” असे पाटील म्हणाले.
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबद्दल शिवसेनेचे नाव न घेता पाटील म्हणाले की, मुंबईत फक्त निधी निर्माण करणे एवढंच काहींचे लक्ष राहिले असून मुंबई ही काही जणांची जहागिरी बनली आहे. सन २०२२ मध्ये मुंबई पालिका जिंकणे हे आमचे मुख्य लक्ष्य राहणार आहे. राज्यातील सर्व पालिका निवडणुका जिंकण्याचा आमचा नव्या वर्षातील संकल्प आहे.
चौकट
संपादक रश्मी ठाकरेंना लिहिणार पत्र
“संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला गेला. याबाबत मी ‘सामना’च्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहून, ही तुमची भाषा असू शकत नाही तर मग अग्रलेखात ही भाषा कशी आली अशी विचारणा करणार आहे.”
-चंद्रकात पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष