विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नसल्याने टीका : पंकजा मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 12:29 AM2018-12-24T00:29:37+5:302018-12-24T00:30:17+5:30
केंद्र व राज्यातील सरकार जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून विकासाच्या दिशेने पारदर्शक कारभार करीत आहे. परंतु, विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नसल्याने ते टीका करून सरकारला बदनाम करायचा निरर्थक प्रयत्न करीत आहेत.
कदमवाकवस्ती : केंद्र व राज्यातील सरकार जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून विकासाच्या दिशेने पारदर्शक कारभार करीत आहे. परंतु, विरोधकांकडे कुठलेच मुद्दे नसल्याने ते टीका करून सरकारला बदनाम करायचा निरर्थक प्रयत्न करीत आहेत, असा टोला राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लगावला.
श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अभियान अंतर्गत लोणी काळभोर गावसमुहाच्या मंजूर विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रम कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे रविवारी (दि. २३) झाला. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
१) लोणी काळभोर गावासाठी १६ कामांना ६ कोटी ८५ लाख ५० हजार रुपये (३ कोटी ६० लाख २५ हजार रुपये) २) कुंजीरवाडी गावासाठी १४ कामांना १ कोटी ५१ लाख रुपये (७५ लाख ५० हजार रुपये) ३) सोरतापवाडी गावासाठी ३ कामांना ६५ लाख रुपये (३७ लाख ५० हजार रुपये ) ४) शिंदवणे गावासाठी ४ कामांना १ कोटी ३५ लाख रुपये (१ कोटी ३५ लाख रुपये) ५) आळंदी म्हातोबाची गावासाठी १० कामांना ७० लाख रुपये (३५ लाख रुपये) ६) तरडे गावासाठी ३ कामांना ६७ लाख रुपये मंजूर (३३ लाख ५० हजार रुपये) इत्यादी विकासकामांची उद्घाटने या वेळी पंकजा मुंडे व शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते झाली.
या कार्यक्रमास शिरूर हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे, भाजपा कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी, हवेली तालुका अध्यक्ष रोहिदास उंदरे, गणेश कुटे, दादापाटील फराटे, प्रवीण काळभोर, श्याम गावडे, कदमवाकवस्ती ग्रामपंचायतच्या सरपंच गौरी गायकवाड, उपसरपंच बाळासोा कदम, सर्व ग्रा. पं. सदस्य आणि इतर सहा गावातील सरपंच, उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना मुंडे म्हणाल्या, केंद्र शासन व राज्यशासनाच्या वतीने ज्या महत्त्वाकांक्षी योजना जनसामान्यांसाठी अमलात आणल्या, त्या तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचल्याचे समाधान होत असून, येणाऱ्या काळात हीच जनता आम्हाला आमच्या कामाची पावती देईल.