विमानतळाला शेतक-यांचा विरोधच , विजय शिवतारेंनी उतावीळ होऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:49 AM2017-09-22T00:49:00+5:302017-09-22T00:49:00+5:30
पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाला बाधित गावांतील शेतकरी, नागरिकांचा विरोध असताना पुरंदरचे लोकप्रतिनिधी आणि राज्यमंत्री विजय शिवतारे हे विमानतळ पुरंदरमध्येच होणार, असे सांगत सुटले आहेत.
सासवड : पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाला बाधित गावांतील शेतकरी, नागरिकांचा विरोध असताना पुरंदरचे लोकप्रतिनिधी आणि राज्यमंत्री विजय शिवतारे हे विमानतळ पुरंदरमध्येच होणार, असे सांगत सुटले आहेत. यामुळे शेतक-यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. विमानतळविरोधी जनसंघर्ष समितीच्या वतीने याचा पत्रकार परिषदेत निषेध करण्यात आला.
या वेळी जि. प. सदस्य व जनसंघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता झुरंगे यांसह समितीचे सदस्य आणि बाधित गावांचे सरपंच उपस्थित होते.
आमदार विजय शिवतारे हे आपल्या भागामध्ये विकासकामे करण्याऐवजी विमानतळासाठी उतावीळ झाल्याचे दिसून येत आहेत. जमिनीचे मालक शेतकरी आहेत, त्यामुळे त्यांचे मत महत्त्वाचे आहे. त्यांनी आंदोलने, मोर्चे काढून आपला तीव्र विरोध नोंदविला, असे झुरूंगे यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी विमानतळविरोधी जन संघर्ष समितीचे उपाध्यक्ष व कुंभारवळणाचे सरपंच अमोल कामथे, सहसचिव लक्ष्मण बोरावके तसेच मेमाणे-पारगावचे सरपंच बापू मेमाणे, एखतपूर-मुंजवडीच्या सरपंच लक्ष्मी काळुराम धिवार, उदाचीवाडीच्या सरपंच सुनंदा चंद्रकांत झेंडे, वनपुरीच्या सरपंच विद्या दत्तात्रय महामुनी यांसह जनसंघर्ष समितीचे सदस्य महादेव टिळेकर, जितेंद्र मेमाणे, विठ्ठल मेमाणे, रामदास होले, महादेव कुंभारकर, रामदास कुंभारकर, निवृत्ती कामथे, सतीश कुंभारकर, मच्छिंद्र कुंभारकर आदी उपस्थित होते.
जमिनी शेतकºयांच्या असून त्यांनी यापूर्वीही वेळोवेळी मोर्चे, आंदोलने करून विरोध केला आहे. एक इंचही जमीन देणार नसल्याचे ठरविले आहे, असे असताना पुरंदरमध्येच विमानतळ होणार, असे बोलणारे शिवतारे कोण? असा सवाल या वेळी झुरंगे यांनी केला. शेतकरी विमानतळासाठी जमिनी देण्यास तयार नाहीत. यापूर्वी ७ आॅक्टोबर २०१६ रोजी मेमाणे-पारगाव येथे झालेल्या बैठकीत शिवतारे यांनी विमानतळाबाबत मी शेतकºयांच्या निर्णयाबरोबर आहे, शेतकºयांना विमानतळ नको असेल तर मी होऊ देणार नाही, असे जाहीरपणे सांगितले होते. मात्र त्यानंतर शिवतारे या भागात फिरकलेही नाहीत.