एफटीआयआयच्या कार्यपद्धतीवर आक्षेप; नवनियुक्त चेअरमन अनुपम खेर यांना विद्यार्थ्यांनी पाठविले पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 12:59 AM2017-10-15T00:59:26+5:302017-10-15T01:00:00+5:30
केवळ निधी संकलित करण्यासाठी २० दिवसांचे लेखन आणि चित्रपट विषयांचे लघुअभ्यासक्रम आयोजित करून सर्वांनाच मूर्ख बनविण्याचा प्रकार सुरू आहे. अशा लघू अभ्यासक्रमातून खरच त्या विषयांचे संपूर्ण ज्ञान आत्मसात करता येते का?
पुणे : केवळ निधी संकलित करण्यासाठी २० दिवसांचे लेखन आणि चित्रपट विषयांचे लघुअभ्यासक्रम आयोजित करून सर्वांनाच मूर्ख बनविण्याचा प्रकार सुरू आहे. अशा लघू अभ्यासक्रमातून खरच त्या विषयांचे संपूर्ण ज्ञान आत्मसात करता येते का? असा सवालच एफटीआयआयच्या स्टुडंट असोसिएशनने उपस्थित केला आहे. याशिवाय संस्थेच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप घेणारे पत्र नवनियुक्त चेअरमन अनुपम खेर यांना पाठविले आहे.
एफटीआयआयचे माजी चेअरमन गजेंद्र चौहान यांना हटविण्यासाठी विद्यार्थ्यांनी तब्बल सहा महिने शासनाविरुद्ध आंदोलन केले, परंतु भविष्यात पुन्हा विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारू नये, यासाठी श्रेयांक पद्धत लागू करून विद्यार्थ्यांनी नवीन अभ्यासक्रमावर लक्ष्य केंद्रित करावे, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले. मात्र, एफटीआयआय हे सर्जनशील कलाकार निर्माण करण्याचे व्यासपीठ असल्याने प्रशासनाकडून उपक्रमाच्या नावाखाली चालविल्या जाणाºया गोष्टींवरच आक्षेप घेत, खेर यांचे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न स्टुडंट असोसिएशनने केला आहे.
सुविधा, दुरुस्तीसाठी रक्कम खर्च करावी
एका वर्षांपासून प्रशासन ‘ओपन डे’,‘फाउंडेशन डे’सारख्या उपक्रमांवर पैसा खर्च करीत आहे. त्यापेक्षा संस्थेमधील मूलभूत सुविधांसह आवश्यक साधनांच्या दुरुस्तीसाठी ही रक्कम खर्च केली, तर विद्यार्थ्यांना वेळेत प्रकल्प सादर करता येतील. तीन दिवसांत ८ तासांच्या शिफ्टवरून दोन दिवस १२ तासांची शिफ्ट दिली आहे. हे अन्यायकारक आहे. फेब्रुवारीत नियामक मंडळाने शैक्षणिक अभ्यासक्रम, शुल्क पद्धत याविषयीच्या चर्चेमधून विद्यार्थी प्रतिनिधीला वगळण्याचा घेतलेला निर्णयही असंवैधानिक आहे, असे संघटनेने पत्रात नमूद केले आहे.