धनकवडीतील कोविड केंद्राला असणारा विरोध मावळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:10 AM2021-04-24T04:10:40+5:302021-04-24T04:10:40+5:30
भारती विद्यापीठ येथील त्रिमूर्ती चौक परिसरातील ईच्छापूर्ती गणपती मंदिरासमोरील वसुंधरा गर्ल्स होस्टेल या खासगी इमारतीमध्ये कोविड सेंटर उभारण्याची तयारी ...
भारती विद्यापीठ येथील त्रिमूर्ती चौक परिसरातील ईच्छापूर्ती गणपती मंदिरासमोरील वसुंधरा गर्ल्स होस्टेल या खासगी इमारतीमध्ये कोविड सेंटर उभारण्याची तयारी सुरू झाली. आणि हे शेजारच्या सोसायटीतील नागरिकांना समजताच तेथील नागरिकांनी त्याला तीव्र विरोध केला. परंतु लोकमतच्या वृत्तामुळे झालेली जनजागृती, नगरसेवक महेश वाबळे यांचे प्रयत्न आणि सिद्धिविनायक कोविड सेंटरच्या डॉक्टरांनी दाखवलेल्या धैर्यामुळे अखेर या कोविड सेंटर उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या कोविड सेंटरचा शुभारंभ करण्यात आला.
सिद्धिविनायक कोविड केअर सेंटर उभारणीमध्ये संस्थापक डॉ. भूषण लाळगे, डॉ. अजित डेंगळे, डॉ. अक्षय देशमुख, डॉ. ओंकार सहाणे, डॉ. शाबाज शेख यांचे मोलाचे योगदान आहे. या वेळी सामाजिक कार्यकर्ते विनायक भोसले, कार्यकर्ते योगेश शेलार, संतोष जाधव उपस्थित होते. या ठिकाणी कोविड रुग्णांसाठी ३० ऑक्सिजन बेड आणि ३० आयसोलेशन बेड उपलब्ध होणार असल्याने खरे तर स्थानिक नागरिकांचाच अधिक लाभ होणार आहे, असे मत नगरसेवक महेश वाबळे यांनी व्यक्त केले.