विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांवर पुण्यात गुन्हा दाखल; महिलांविषयी केलं होतं अपमानास्पद वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 01:13 PM2021-09-22T13:13:12+5:302021-09-22T17:07:48+5:30
शिरुर येथे १३ सप्टेंबर रोजी आदयक्रांतीकारक उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमातील भाषणामध्ये प्रविण दरेकर यांनी जाणून बूजून राष्ट्रवादी काँग्रेसबाबत वादग्रस्त व्यक्तव्य केले होते.
पुणे : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशावर महिलांविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रविण दरेकर यांच्याविरुद्ध कलम ५०९ खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरुर येथे १३ सप्टेंबर रोजी आदयक्रांतीकारक उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमातील भाषणामध्ये प्रविण दरेकर यांनी जाणून बूजून राष्ट्रवादी काँग्रेसबाबत वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. हे वक्तव्य व्हिडिओ रेकॉर्डिंग सोशल मिडिया व टीव्ही चॅनेल व वृत्तपत्रांमध्ये प्रसारित झालेले आहे. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये १४ सप्टेंबर रोजी प्रवेश करणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी हे विधान केलेले आहे.
त्यामुळे त्यांनी केलेल्या विधानामुळे एक स्त्री म्हणून माझ्या मनास लज्जा उत्पन्न झाली आहे. दरेकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तमाम महिला वर्गाचे मनामध्ये लज्जा उत्पन्न होऊन महिलांच्या वियनशिलतेचा अपमान केलेला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. रुपाली चाकणकर यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे अर्ज दिला होता. मंगळवारी मध्यरात्री उशिरा पोलिसांनी प्रविण दरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कायद्याच्या चौकटीत मला न्याय मिळेल अशी आशा :- रुपाली चाकणकर
“तुमच्या बोलण्यावरुन तुमच्या पक्षाची संस्कृती काय आहे हे दिसून येतं. प्रवीणजी दरेकर आपण ज्या पद्धतीचं वक्तव्य केलंय, त्याच्याबद्दल आपण महिलांची माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड सुद्धा रंगवू शकतो याची सुद्धा जाणीव आपण ठेवावी”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. प्रवीण दरेकर यांनी इतक्या दिवसात महिलांची माफी मागितली नाही, त्यांनी महिलांना लज्जा होईल असं वक्तव्य केलं. उर्मटपणाची प्रतिक्रिया दिली, त्यामुळे मी स्वत: पोलिसात तक्रार दिली आहे. कायद्याच्या चौकटीत मला न्याय मिळेल अशी आशा आहे, असं रुपाली चाकणकर यांनी सांगितले.''