मेकँझी कंपनीला विरोध
By Admin | Published: August 29, 2015 03:42 AM2015-08-29T03:42:44+5:302015-08-29T03:42:44+5:30
स्मार्ट सिटीसाठीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी मेकँझी कंपनीला सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी विरोध केला आहे.
पुणे : स्मार्ट सिटीसाठीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी मेकँझी कंपनीला सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांनी विरोध केला आहे. राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दबावातून खासगी कंपनीचा फायदा करण्याचा हा डाव असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे.
स्मार्ट सिटीसाठी पुणे शहराची निवड झाली आहे. येत्या तीन महिन्यांत केंद्र सरकारकडे त्यासाठी सविस्तर प्रस्ताव पाठवायचा आहे. कोणती कामे करायची, त्यात प्राधान्य कशाला द्यायचे वगैरे कामासाठी सल्लागार म्हणून मेकँझी कंपनीची निवड करण्याचा विषय स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. समितीमध्ये हा विषय घेणे बेकायदेशीर आहे, संबधित कंपनी इतकी चांगली असेल तर ती खुल्या स्पर्धेत का उतरत नाही असा प्रश्न केसकर यांनी उपस्थित केला आहे.
मेकँझीचे प्रमुख, पुण्यातील एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व राज्य सरकारमधील एक वरिष्ठ अधिकारी यांच्या संयुक्त दबावातून या कंपनीला हे काम देण्याचा घाट घातला जात असल्याची शंका केसकर यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वीही एकदा मेकँझीला सल्लागार म्हणून महापालिकेत आणण्याचा प्रयत्न झाला होता. त्या वेळी लोकायुक्तांकडे तक्रार केली गेली. त्याबाबत लोकायुक्तांनी नोंदवलेली निरीक्षणे व महापालिका कायदा यांचा विचार करून या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याचा विषय मागे घ्यावा अशी मागणी केसकर यांनी केली आहे. त्याचबरोबर महापालिकेचा विकास आराखडा तयार करणारे अनुभवी अधिकारी, या क्षेत्रातील जाणकार पुणेकर यांचा सल्ला घ्यावा, असेही केसकर यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)